सर्वोत्तम संधीची खाण म्हणून भारतातील असंख्य होतकरू तपगण ‘अमेरिकी स्वप्ना’चा पाठलाग करीत असले, तरी प्रत्यक्षात अमेरिकेतील असंख्य भारतीयांसाठी रोजचे जगणे म्हणजे एक दु:स्वप्न झाले आहे. अमेरिकेत करण्यात आलेल्या एका अधिकृत सर्वेक्षणातून ही बाब उघड झाली आहे. या सर्वेक्षणानुसार, अमेरिकेतील सर्व वांशिक गटांमध्ये सर्वाधिक दरडोई उत्पन्न असलेल्या भारतीयांमध्ये दारिद्रय़रेषेखाली जगणाऱ्या लोकांचे प्रमाण ८.२ टक्के एवढे आहे.
‘अमेरिकन कम्युनिटी सव्‍‌र्हे, २००७-२०११’च्या बुधवारी जाहीर करण्यात आलेल्या अहवालानुसार अमेरिकेत तब्बल ४२.७ दशलक्ष नागरिक दारिद्रय़रेषेखालचे जीवन जगत असून, देशाचा दारिद्रय़दर १४.७ टक्के एवढा आहे. यातील ८.२ टक्के नागरिक मूळचे भारतीय आहेत. अन्य वांशिक गटांतील नागरिकांच्या तुलनेत भारतीय अमेरिकनांमधील गरिबांची संख्या अधिक आहे. भारतीय अमेरिकनांप्रमाणेच जपानी अमेरिकनांमधील दारिद्रय़रेषेखालील नागरिकांचे प्रमाण ८.२ टक्के एवढेच आहे, तर व्हिएतनामींमध्ये ते १४.७ टक्के आणि कोरियन नागरिकांमध्ये ते १५ टक्के एवढे आहे. आशियायी नागरिकांपैकी फिलिपिनी अमेरिकनांमध्ये सर्वात कमी म्हणजे ५.८ टक्के एवढेच लोक दारिद्रय़रेषेखाली जीवन जगत आहेत.
दारिद्रय़ाची व्याख्या : अमेरिकी सरकारच्या व्याख्येनुसार, दारिद्रय़ाची व्याख्या एकूण उत्पन्नावर आधारित आहे. उदाहरणार्थ, २०१२ मध्ये चार सदस्यांच्या कुटुंबासाठी २३ हजार ५० डॉलर (सुमारे १२ लाख रु.) एवढे वार्षिक उत्पन्न ही दारिद्रय़रेषा निश्चित करण्यात आली होती.