८० सनदी अधिकाऱ्यांची बैठक; असुरक्षिततेची भावना

राजधानीत एकत्र आलेल्या सुमारे ८० सनदी अधिकाऱ्यांनी प्रशासनातील ‘बदलत्या वातावरणाबाबत’ चिंता व्यक्त केली. त्वरेने निर्णय घेण्यात येत असले, तरी हे निर्णय घेणाऱ्यांच्या संरक्षणासाठी उपाय योजले जात नसून, या निर्णयांची सीबीआय व केंद्रीय दक्षता आयोगामार्फत (सीव्हीसी) छाननी होत असल्याने अधिकाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना पसरल्याचे मत या वेळी व्यक्त करण्यात आले.

गृहमंत्रालयातील संयुक्त सचिव जी.के. द्विवेदी आणि कोळसा घोटाळ्यात स्वत:चा बचाव करण्याऐवजी तुरुंगात जाण्याची तयारी दर्शवणारे माजी कोळसा सचिव एच.सी. गुप्ता यांच्या निलंबनाच्या पाश्र्वभूमीवर, विविध मुद्दय़ांवर चर्चा करण्यासाठी सनदी अधिकाऱ्यांनी शनिवारी गोलमेज बैठक बोलावली होती. देशभरातील विविध तुकडय़ांचे आयएएस अधिकारी उपस्थित असलेल्या या बैठकीत, विद्यमान आणि माजी नोकरशहांनी ‘बदलत्या वातावरणाबाबत’ चिंता व्यक्त केली; तथापि ही चर्चा कुठल्या बदलाच्या संदर्भात होती हे स्पष्ट होऊ शकले नाही.

या बैठकीला हजर असलेल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निर्णय मुक्त, नि:पक्षपाती व कुठल्यादी दबावाशिवाय घेतले जावेत याबद्दल चर्चा करण्यात आली. याच वेळी, सध्या प्रत्येक नोकरशहाला आपल्या निर्णयाकडे सीबीआय किंवा सीव्हीसी भविष्यात कशा प्रकारे पाहील याबाबत विचार करणे भाग पडत आहे. जलदगतीने निर्णय घेण्यात हा अडथळा ठरत असल्याचा मुद्दाही चर्चिला गेला.निर्णय लवकर घेतले जावेत यावर सरकारचा भर असला, तरी नोकरशहांना संरक्षण देणारे काहीच उपाय नसल्याचे दुसऱ्या अधिकाऱ्याने सांगितले. यामुळे नोकरशहांमध्ये असुरक्षिततेची भावना असून, परिस्थिती कशा रीतीने हाताळावी हे अनेकांना कळत नाही, याकडे एका अधिकाऱ्याने लक्ष वेधले.

  • सनदी अधिकाऱ्यांच्या बैठकीत मुख्यत्वे चार मुद्यांवर चर्चा करण्यात आली. बदलत्या प्रशासकीय गरजेनुसार भूमिकेत बदल करणे, कार्यक्षमता आणि धाडस, हस्तक्षेपमुक्त निर्णय प्रक्रिया आदी मुद्यांवर या वेळी चर्चा करण्यात आली.
  • केंद्रात प्रतिनियुक्ती देण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्यास नकार देऊन सनदी अधिकाऱ्यांची प्रगती रोखणाऱ्या राज्यांच्या भूमिकेबाबतही चर्चा करण्यात आली.

 

असहिष्णुता देशाला शाप!

रतन टाटा यांचे प्रतिपादन; जनतेला सहिष्णू देश हवाय

ग्वाल्हेर : ‘अलीकडच्या काळात देशाला लागलेला शाप’ अशा शब्दांत टाटा सन्सचे चेअरमन एमिरेटस (अध्यक्ष) रतन टाटा यांनी देशातील वाढत्या असहिष्णुतेबद्दल चिंता व्यक्त केली. ग्वाल्हेर येथील शिंदे स्कूलच्या ११९व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते शनिवारी बोलत होते. त्यांच्यापूर्वी काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनीही अशाच प्रकारचे विचार व्यक्त केले. त्याला टाटा यांनी दुजोरा दिला.

मला वाटते की, प्रत्येकाला ही अहिष्णुता म्हणजे काय आणि ती कोठून पसरवली जात आहे हे माहीत आहे. देशातील लाखो नागरिकांना असहिष्णुताविरहित देश पाहायचा आहे, असे टाटा यांनी सांगितले.

तत्पूर्वी झालेल्या भाषणात शिंदे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना म्हटले की, आम्हाला तुम्ही विजयी झालेले, यशस्वी झालेले आणि विचारवंत झालेले पाहायचे आहे. चर्चा, वादविवाद आणि मतभिन्नता ही सुसंस्कृत समाजाची लक्षणे आहेत. मात्र देशात सध्या सहिष्णुतेचे वातावरण आहे. देशातील प्रत्येकाला काय बोलायचे, काय ऐकायचे, कोणती वेशभूषा करायची, काय खायचे याच्या सूचना केल्या जात आहेत. मात्र मतभिन्नतेवर बडगा आणणे हे समाजाच्या प्रगतीच्या विरोधातील आहे. शिंदे यांनी असे म्हणत गोरक्षकांवरही ताशेरे ओढले.

शिंदे यांच्या या विचारांना सहमती दर्शवत टाटा यांनी सांगितले की, महाराज (ज्योतिरादित्य) असहिष्णुतेबद्दल बोलले. हा अलीकडच्या काळात देशाला लागलेला शाप असल्याचे आपण पाहत आहोत. आपल्याला अशा वातावरणात जगायचे आहे की जेथे आपल्याला आपापसांत प्रेम असेल, जिथे आपण कोणाला गोळी घालणार नाही, कोणाला ठार मारणार नाही. जिथे कोणी कोणाला वेठीस धरणार नाही, तर आपापसांत देवाणघेवाण होईल.