गुजरातमध्ये गेल्या चार वर्षांत ८९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असून, त्यांच्या आत्महत्येचे कारण हे पिकांची हानी हे नव्हते तर त्यामागे इतर कारणे होती, असे गुजरातच्या कृषी खात्याने म्हटले आहे.
कृषिमंत्री बाबू बोखिरिया यांनी विधानसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात म्हटले आहे, की एकूण ८९ शेतकऱ्यांनी २०१० ते ३१ जुलै २०१४ या काळात आत्महत्या केल्या असून, त्याचा पिकांशी काही संबंध नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे वर्गीकरण पिकांची हानी, कर्जबाजारीपणा व इतर कारणे यात करण्यात आले आहे. किमान ७८ शेतकऱ्यांनी इतर कारणास्तव आत्महत्या केल्या असून, आठ शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणामुळे तर तीन शेतकऱ्यांनी कृषी कर्ज वाढल्याने आत्महत्या केल्या.
पिकांच्या हानीमुळे कुणीही आत्महत्या केली नाही असे काँग्रेस आमदार तेजश्री पटेल यांच्या प्रश्नावर सांगण्यात आले.