उच्चशिक्षितांचा उमेदवारांत समावेश

मध्य प्रदेशात पोलीस शिपायाच्या १४ हजार जागांसाठी किमान ९ लाख अर्ज आले असून, त्यात पीएचडी व पदव्युत्तर, अभियांत्रिकी पदवीधारक यांच्यासह ९ लाख जणांचे अर्ज आले आहेत. मध्य प्रदेश व्यावसायिक शिक्षण मंडळ यासाठी एक परीक्षा घेणार असून, त्यांनी दिलेल्या माहितीनुसार ९.२४ लाख उमेदवारांपैकी १.१९ लाख पदवीधर, १४५६२ पदव्युत्तर, ९६२९ अभियंते व १२ पीएच.डी लोकांनी अर्ज केले आहेत.

या पदासाठी किमान पात्रता बारावी इयत्ता उत्तीर्ण अशी असताना उच्चशिक्षितांनीही त्यासाठी अर्ज केले आहेत. एमपीपीइबीचे संचालक भास्कर लाक्षाकार यांनी सांगितले, की पीएच.डी., अभियांत्रिकी पदवी असलेले उमेदवार यात आहेत. १७ जुलैला ही परीक्षा होणार आहे. आमचे काम परीक्षा घेणे हे आहे. त्याचे विश्लेषण याच्याशी आमचा संबंध नाही.

’ अर्जदारांमध्ये बारावी उत्तीर्ण असलेले पाच लाख युवक असून पदविकाधारक ३४३८ आहेत. अनुसूचित जाती-जमातीचे २.५८ लाख उमेदवार आहेत, ते आठवी उत्तीर्ण असून त्यांच्यासाठी पात्रता कमी आहे. या पदासाठी ५२००-२०२०० व १९०० ग्रेड पे अशी महिना वेतनश्रेणी आहे. ’ गेल्या वर्षी वनरक्षक पदासाठी ६.१ लाख अर्ज आले होते, त्यात अभियांत्रिकी पदवी असलेले १२ हजार, पीएच.डी. असलेले ३४, दहावी उत्तीर्ण ३.३५ लाख तर बारावी उत्तीर्ण १.१७ लाख उमेदवार होते.