हरियाणातील गुडगावमध्ये डेकेअर सेंटरमधील निष्काळजीपणा नऊ महिन्याच्या चिमुरडीसाठी वेदनादायी ठरला आहे. डायपर बदलत असताना केअरटेकरच्या निष्काळजीपणामुळे चिमुकलीचा हात दारामध्ये अडकला असून यात तिच्या डाव्या हाताचे बोट तुटले आहे. या प्रकाराने संतापलेल्या पालकांनी डेकेअर सेंटरवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

गुडगावमध्ये फॉर्टिज मेमोरिअल इन्स्टिट्यूटचे डेकेअर सेंटर आहे. या डेकेअर सेंटरमध्ये भावना रस्तोगी यांनी त्यांच्या नऊ महिन्याच्या मुलीला ठेवले होते. मुलांची देखभाल करण्याची जबाबदारी असलेल्या या डेकेअर सेंटरमध्ये चिमुकलीकडे दुर्लक्ष झाले आणि हा निष्काळजीपणा चिमुकलीसाठी वेदनादायी ठरला. भावना रस्तोगी यांनी फेसबुकवर संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे. पोस्टमध्ये भावना रस्तोगी म्हणतात, ही पोस्ट लिहीताना माझी नऊ महिन्यांची मुलगी माझ्या बाजूला झोपली आहे. तिच्या डाव्या हाताचे बोट तुटले आहे. यासाठी डेकेअर सेंटरमधील मोलकरीण जबाबदार आहे. मुलीचे डायपर बदलताना संबंधीत मोलकरीणने दरवाजा बंद केला. पण यादरम्यान माझ्या मुलीचे बोट दरवाज्यात अडकले आणि तिचे बोट तुटले असे रस्तोगींनी म्हटले आहे. या प्रकारामुळे मुलीच्या हातावर शस्त्रक्रिया करावी लागली असून यातून बरे होण्यासाठी तिला आणखी काही महिने लागतील असे रस्तोगी सांगतात. या प्रकाराने माझ्या मुलीला झालेल्या वेदना काय असतील याचा सर्वांनाच अंदाज येईल असेही त्यांनी आवर्जून नमूद केले.

डेकेअर सेंटरचा निष्काळजीपणा इथेच संपत नाही. १९ मेरोजी ही घटना घडली होती. रस्तोगी यांनी डेकेअर सेंटरमधील कर्मचाऱ्यांना सीसीटीव्ही फुटेज मागितले. पण त्यांनी फुटेज देण्यास नकार दिला. सीसीटीव्ही अचानक बंद झाल्याने फुटेज उपलब्ध नसल्याचे सेंटरमधील कर्मचाऱ्यांनी सांगितल्याचा दावा रस्तोगींनी फेसबुक पोस्टमध्ये केला आहे. या घटनेनंतर आम्ही डेकेअर सेंटरमध्ये जाऊन पाहणीदेखील केली होती. बाथरुममध्ये मुलांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष झाल्याच्या आमच्या पाहणीतून समोर आले होते असे रस्तोगींनी पोस्टमध्ये म्हटले आहे. रस्तोगींची फेसबुक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असून या घटनेने डेकेअरमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

फॉर्टिज समुहाचे असोसिएट व्हाईस प्रेसिंडट अजय महाराज यांनी इंडियन एक्सप्रेस.कॉ़मला या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. ‘आम्ही डेकेअर सेंटरची जबाबदारी थर्ड पार्टीकडे दिली आहे. फॉर्टिज हेल्थकेअरमध्ये कडक नियम असून थर्ड पार्टीलाही याचे पालन करणे बंधनकारक असते. आम्ही या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असून दोषी आढळल्यास संबंधीतांवर कारवाई करु’ असे त्यांनी सांगितले.