सियाचेनमध्ये हिमकडे कोसळल्याच्या घटनेत प्रतिकूल परिस्थितीत देशासाठी प्राणार्पण केले त्यातील नऊ जवानांचे पार्थिव आज लडाख येथील सियाचेन तळावर आणण्यात आले. नंतर ते हवामान व्यवस्थित झाल्यानंतर लेहला नेले जाणार आहेत. वीर जवान लान्स नायक हनमंतप्पा कोप्पड यांना जिवंत बाहेर काढण्यात आले होते, पण दुर्दैवाने त्यांची झुंज ९ फेब्रुवारीला रुग्णालयात उपचार घेत असताना अपयशी ठरली होती.
लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले की, सर्व पार्थिव सियाचेन तळावर आणण्यात आले आहेत. हेलिकॉप्टर्सच्या माध्यमातून ते लेह येथे नेण्यात येणार आहेत पण त्यासाठी हवामान सुधारण्याची प्रतीक्षा आहे. उद्या सकाळी हवामान सुरळित होण्याची शक्यता असून नंतर हे पार्थिव नेले जातील. सियाचेन तळ ते लेह या पट्टय़ात सध्या हेलिकॉप्टर उड्डाणास अनुकूल वातावरण नाही. त्यामुळे हवामान सुरळित झाल्यानंतरच पार्थापूर येथील हंडरच्या लष्करी रुग्णालयात या जवानांचे पार्थिव नेले जाईल.
खराब हवामानामुळे आधी जवानांचे पार्थिव सियाचेन हिमनदी प्रदेशातील उंचावरील भागातून पायथ्याशी आणणे जड गेले होते.
कनिष्ठ अधिकारी व मद्रास रेजिमेंटचे नऊ जवान ३ फेब्रुवारीला हिमपात होऊन गाडले गेले होते, कारण त्यांच्या १९,६०० फूट उंचीवरील छावणीवर हिमकडे कोसळले होते, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून जवळच ही चौकी होती. तेथे तापमान उणे ४५ अंश सेल्सियस असते.
सियाचेन तळावर आणण्यात आलेल्या पार्थिव देहात नागेशा टीटी (तेजूर, जि. हासन), एलुमलाय एम ( दुक्कम पराय, जि. वेल्लोर), एस.कुमार (कुमानन थोझू , जि. ठेणी), सुधीश (मोनोरोथुरथ, कोल्लम), महेश पीएन (एचडी कोट, जि.म्हैसूर) यांचा समावेश आहे. गणेशन (चोकइव्हान पट्टी, मदुराई), राममूर्ती (गुदीसतना पल्ली, कृष्णगिरी), मुश्ताक अहमद ( परनपल्ले, कुर्नुल), सूर्यवंशी एस.व्ही. (मस्कारववाडी, सातारा) यांचे पार्थिव यापूर्वीच आणण्यात आले होते.