शिक्षणासाठी अमेरिकेमध्ये जाण्याला भारतीय विद्यार्थ्यांची सर्वाधिक पसंती असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळेच अमेरिकेचा व्हिसा मिळवण्यासाठी अर्ज करणाऱया विद्यार्थ्यांच्या प्रमाणात गेल्या वर्षीच्या तुलनेत ६० टक्क्यांनी वाढ झाली आहे. यंदा व्हिसा मिळवण्यासाठी ९० हजार अर्ज आले असून, त्यापैकी केवळ चार हजार जणांनाच शैक्षणिक कारणांसाठीचा व्हिसा मिळणार आहे.
अमेरिकी दूतावासाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, मुंबई आणि हैदराबाद या दोन्ही ठिकाणी व्हिसा मिळवण्यासाठी आलेल्या अर्जांमध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत दुपटीने वाढ झाली आहे. अर्ज केलेल्यांपैकी चार हजार जणांना दिल्लीतील मुख्य दूतावास त्याचबरोबर मुंबई, चेन्नई, हैदराबाद आणि कोलकाता येथील वाणिज्य दूतावास कार्यालयांकडून व्हिसा मंजूर करण्यात येणार आहे.
अमेरिकेमध्ये सध्या एक लाखांहून अधिक परदेशी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामध्ये सर्वाधिक विद्यार्थी चीनमधील असून, त्याखालोखाल भारतातील विद्यार्थ्यांची संख्या आहे.