गुजरातमधील गांधीनगरच्या एका रहिवाशाने वातानुकूलित यंत्रे दुरुस्तीचा उद्योग करतानाच वातानुकूलित सोफा तयार केला असून त्याला अतिशय कमी वीज लागते. घराबाहेरील कार्यक्रमातही हा सोफा वापरता येतो.  गांधीनगरचे रहिवासी दशरथ पटेल यांनी हा सोफा तयार केला असून त्यांना काही वर्षांपूर्वी सुचलेली कल्पना त्यांनी प्रत्यक्षात आणली आहे, त्यांना यात उत्पादनांची रचना या विषयावर संशोधन करणाऱ्या नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ डिझाइन या संस्थेने मदत केली आहे.
पटेल यांनी सांगितले, की २००८ मध्ये आपल्याला सोफ्यात वातानुकूलित यंत्र बसवण्याची कल्पना सुचली होती व पहिला तसा सोफा १७५ किलो वजनाचा होता व तो फार जड होता, त्यानंतर आपल्याला सरकारच्या डिझाइन क्लिनिक योजनेची माहिती समजली, त्यामुळे संबंधितांकडे संपर्क साधला, त्यांनी आपल्याला डिझायनरची (आरेखकाची) मदत उपलब्ध करून दिली व सोफ्याचे वजन वेगळी साधने वापरून ३५ किलो करून दिले. सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग विभागाने २०१० पासून नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ डिझाइन या संस्थेच्या सहकार्याने काम सुरू केले, असे डिझाइन क्लिनिक योजनेचे प्रकल्प अधिकारी कुमारपाल परमार यांनी सांगितले. नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ डिझाइनचे माजी विद्यार्थी अंकित व्यास यांनी पटेल यांना वातानुकूलित, हलका व किफायतशीर सोफा तयार करण्यास मदत केली. पटेल यांनी सांगितले, की हा सोफा आता १ ते १.२५ लाख रुपये किमतीने विकला जाणार आहे. व्यास हे डिझाइन स्टुडिओ चालवतात. त्यांनी सांगितले, की तो स्प्लिट एसीसारखा हा सोफा काम करतो. यात एसी आतल्या बाजूला व हवेची नळी बाहेर काढलेली असते, तो घरातील वातानुकूलित यंत्रासारखाच काम करतो व दूरनियंत्रकाने त्याचे तपमान कमी करता येते, फॅन मोडवरही तो चालवता येतो. आधीचा वातानुकूलित सोफा लाकडाचा होता पण वातानुकूलन यंत्राची नळीही लाकडी होती त्यामुळे तो जड झाला होता. आपण त्यात बदल करून ग्लास फायबरचा वापर केला व नळीसाठी पीव्हीसीचा वापर केला.
हा वातानुकूलित सोफा सामान्य माणसांना परवडू शकेल का, असे विचारले असता व्यास यांनी सांगितले, की हे उत्पादन उद्योग क्षेत्रासाठी आहे व कार्यक्रम व्यवस्थापन (इव्हेन्ट मॅनेजमेंट) व हॉटेल्ससाठी हा सोफा योग्य आहे. राजकीय व धार्मिक मेळावे  यात टॉवर एसी (उंचावर बसवलेली वातानुकूलन यंत्रे) वापरली जातात, आता त्यांनी आमचा हा नवा वातानुकूलित सोफा वापरला, तर १० टक्के वीज बचत होईल. हॉटेल्ससाठी तर तो फारच फायद्याचा आहे. परमार यांच्या मते सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग विभागाने या सोफ्याच्या रचनेतील ६० टक्के खर्च उचलण्याचे मान्य केले आहे व त्यामुळे नवप्रवर्तनशील (इनोव्हेटिव्ह) उद्योजक असलेल्या पटेल यांना यात अनुदान मिळू शकेल.
असा असेल सोफा
* ग्लास फायबर व पीव्हीसीचा वापर
* विजेची १० टक्के बचत
* हॉटेल्स व मोठय़ा कार्यक्रमांसाठी उपयुक्त
* किंमत १ ते १.२५ लाख रुपये
* दूरनियंत्रकाने तपमान कमी-जास्त करणे शक्य