एखाद्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी हुशार विद्यार्थ्यांचा ‘डमी’ म्हणून वापर करण्याचे प्रकार सर्रास ऐकायला मिळतात. मात्र, राष्ट्रीय मुक्त विद्यालय शिक्षण संस्थेने (एनआईओएस) घेतलेल्या एका निर्णयामुळे या प्रकाराला कायमचा चाप बसण्याची शक्यता आहे. ‘एनआईओएस’च्या निर्णयानुसार मुक्त विद्यालयाच्या माध्यमातून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना आधार कार्ड सक्तीचे करण्यात आले आहे. जेणेकरून संबंधित परीक्षार्थीऐवजी दुसऱ्या विद्यार्थ्याला परीक्षेला बसता येणार नाही. केंद्रीय मनुष्यबळ खात्याने काही दिवसांपूर्वीच या प्रस्तावाला मंजुरी दिली. त्यानंतर ‘एनआईओएस’ने परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना आधार सक्तीचे करण्याचा निर्णय घेतला.

यापूर्वी मार्च महिन्यात काही परीक्षा केंद्रांना तपास अधिकाऱ्यांकडून अचानक भेट देण्यात आली होती. तेव्हा अनेक डमी परीक्षार्थी आढळून आले होते. त्यामुळेच ‘एनआईओएस’ने भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी आधार कार्डाची सक्ती करण्याचा निर्णय घेतला. याशिवाय, काही परीक्षा केंद्रांवर स्कॅनिंग मशिन्सही लावण्यात येतील. या मशिन्सद्वारे विद्यार्थ्यांच्या अंगठ्याचा ठसा घेतला जाईल. हा ठसा डेटाबेसमधील निशाणाशी मिळताजुळता असेल तरच विद्यार्थ्यांना परीक्षेला बसून दिले जाईल, अशी माहिती ‘एनआईओएस’च्या एका अधिकाऱ्याने दिली.

१९८९ मध्ये स्थापन झालेल्या ‘एनआईओएस’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यवसायिक, जीवन संवर्धन, सामाजिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा देता येतात. याशिवाय, प्रचलित शिक्षण व्यवस्थेतील दहावी किंवा बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण न होऊ शकलेल्यांनाही अशा मुक्त विद्यालयाचा मोठा आधार वाटतो. प्रचलित अभ्यासक्रमाच्या तुलनेत येथील अभ्यासक्रम व परीक्षा पद्धती अधिक सोपी असल्याचे मानले जाते. परंतु, या ठिकाणीही अनेकजण उत्तीर्ण होण्यासाठी पळवाटा शोधण्याचा प्रयत्न करतात. मात्र, ‘एनआईओएस’च्या नव्या निर्णयामुळे या गैरप्रकारांना आळा बसण्याची शक्यता आहे.