संघटित किंवा असंघटित क्षेत्रातील नोकरदारांसाठी मोठा ‘आधार’ असलेल्या भविष्यनिर्वाह निधी योजनेने (पीएफ) आता प्रत्येक सभासदाने त्याचा आधार कार्ड क्रमांक कळवणे सक्तीचे केले आहे. येत्या ३० जूनपर्यंत संघटित क्षेत्रातील प्रत्येक नोकरदाराला हा क्रमांक पीएफ कार्यालयाला कळवावा लागणार आहे. देशभरातील पाच कोटी पीएफ धारकांना ही सक्ती लागू होणार आहे. गेल्या वर्षी ई-पासबुकची सुविधा सुरू करून पीएफधारकांना मोठाच दिलासा देणाऱ्या सभासदांना आता पीएफ कार्यालयाने आधार कार्ड क्रमांकाची सक्ती केली आहे. पीएफचा लाभ घेणाऱ्या प्रत्येक सभासदाने ३० जूनपर्यंत त्यांचा आधार कार्ड क्रमांक कळवण्याची सूचना पीएफ कार्यालयाने दिली आहे. तसेच १ मार्च २०१३ पूर्वी किंवा नंतर नव्याने नोकरीत रुजू होणाऱ्यांसाठीही आधार क्रमांक कळवण्याची सक्ती पीएफ कार्यालयाने केली आहे.

आधार कार्ड नसल्यास..
ज्या सभासदांकडे आधार क्रमांक नाही त्या सभासदांना त्यांचा सध्याच्या नोकरीतील भरती क्रमांक (एनरोलमेंट आयडी) पीएफ कार्यालयाकडे जमा करावा लागेल. तोच नंतर आधार क्रमांकात रुपांतरित करण्यात येणार आहे.

निवृत्तीवेतन धारकांनाही अनिवार्य
आधार कार्ड क्रमांक जमा करणे निवृत्ती वेतनधारकांसाठीही अनिवार्य असेल. निवृत्ती वेतनधारकांना ज्या बँकेच्या शाखेतून निवृत्तीवेतन मिळते त्या शाखेत हा क्रमांक द्यावा लागेल अथवा थेट पीएफ कार्यालयाकडे आधार कार्ड क्रमांक जमा करावा लागेल.

औद्योगिक क्षेत्रांत मोहीम
संघटित तसेच असंघटित क्षेत्रातील अधिकाधिक कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा यासाठी पीएफ कार्यालयाकडून औद्योगिक क्षेत्रांत विशेष मोहीम राबवली जाणार आहे. त्यातून त्यांना आधार कार्ड क्रमांक दिला जाईल.

पीएफ हस्तांतरण सोपे
नोकरी बदलल्यास संबंधित कर्मचाऱ्याला जुन्या संस्थेकडून नव्या संस्थेकडे पीएफची रक्कम हस्तांतरित करावी लागू नये यासाठी पीएफ कार्यालय सर्व सभासदांचा केंद्रीय डेटाबेस तयार करत आहे. या ठिकाणी सर्व सभासदांना एक विशिष्ट क्रमांक दिला जाईल व तो त्यांचा कायमस्वरूपी क्रमांक असेल. त्यामुळे त्यांनी नोकरीत बदल केला तरी त्यांना पीएफची रक्कम हस्तांतरित करावी लागणार नाही.