पत्रकार अर्णब गोस्वामी यांना नरेंद्र मोदींचा चमचा संबोधल्याने आज तक वृत्तवाहिनीला बुधवारी ट्विटरकरांच्या रोषाचा सामना करावा लागला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी ‘टाईम्स नाऊ’ या इंग्रजी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. यावेळी मोदींनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले होते. ‘आज तक’ वृत्तवाहिनीने त्यांच्या ट्विटर हँडलवरून यासंदर्भात भाष्य करणारे एक छायाचित्र ट्विट केले. या छायाचित्रातील वरच्या भागात मोदी अर्णब गोस्वामी यांना मुलाखत देताना दिसत असून त्याठिकाणी ‘ जेव्हा एखादा चमचा मुलाखत घेतो’ असे लिहण्यात आले होते. तर छायाचित्राच्या खालील भागात ‘इंडिया टुडे’चे सूत्रसंचालक करण थापर मोदींची मुलाखत घेताना दिसत आहेत. याठिकाणी ‘जेव्हा एखादा पत्रकार मुलाखत घेतो’, असे वाक्य लिहिण्यात आले होते. करण थापर यांनी काही दिवसांपूर्वी मोदींची ही मुलाखत घेतली होती. मात्र, काही तिखट प्रश्नांमुळे मोदींनी ही मुलाखत अर्धवट सोडून गेले होते.
दरम्यान, हे छायाचित्र ट्विट केल्यानंतर आज तक वृत्तवाहिनीला ट्विटरकरांच्या रोषाला सामोरे जावे लागले. स्वत:च्या चॅनेलला मोदींची मुलाखत न मिळाल्यामुळे ‘आज तक’ अशाप्रकारे व्यक्त होत आहे, अशा विविध प्रतिक्रियांचा पाऊस ट्विटवर पडताना दिसला. या सगळ्या प्रकारानंतर ‘आज तक’ ने दिलगिरी व्यक्त करत मानवी चुकीमुळे अशाप्रकारचे ट्विट झाल्याचे सांगितले.
aajtak-trending