केंद्र सरकार दलितविरोधी असल्याचा आरोप देशभर होत असताना आम आदमी पक्ष (आप) याच मुद्दय़ावरून पंजाब, गुजरात आणि गोव्यातील निवडणूक लढविणार आहे. यासाठी आपने ‘दलित’ जाहीरनामा सादर केला आहे.

गेल्या काही दिवसांत देशभर घडलेल्या विविध घडामोडींमुळे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारची डोकेदुखी वाढलेली आहे. आम आदमी पक्षाने या मुद्दय़ाचा लाभ घेऊन निवडणुकांसाठी तयारी केली आहे. नरेंद्र मोदी यांनी रामदास आठवले यांचा मंत्रिमंडळात समावेश करून दलित समाजाची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, सध्याच्या घडामोडींमुळे भाजप दलितविरोधी असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. आम आमदी पक्षाने गोवा आणि पंजाब या राज्यांमध्ये या मुद्दय़ाचा जाहीरनाम्यात समावेश केला आहे. त्यामुळे आप या मुद्दय़ावरून रान पेटविणार हे स्पष्ट झाले आहे.

गेल्या काही दिवसांत दलितांवर हल्ले झाल्यानंतरही सरकारने कोणतीही तातडीची कारवाई केलेली नाही. गुजरातमध्ये दलितांना मारहाण करण्याच्या घटना सातत्याने घडतात, असे आपच्यावतीने सांगण्यात आले.

 

नीता अंबानी यांना संरक्षण दिल्लीतील महिला वाऱ्यावर – केजरीवाल

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीता अंबानी यांच्यासारख्या मित्रांना संरक्षण उपलब्ध करून दिले आहे, मात्र दिल्लीतील महिलांना वाऱ्यावर सोडले आहे, अशी टीका दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.

नीता अंबानी यांन ‘वाय’ दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय गृहमंत्रालयाने घेतल्यानंतर केजरीवाल यांनी ट्वीट करून मोदींवर हल्ला चढविला आहे.

दिल्लीत महिलांवर दररोज बलात्कार होत आहेत, वारंवार विनंत्या करूनही त्यांच्या सुरक्षेची दखल घेतली जात नाही, मात्र मोदी त्यांच्या मित्रांना सुरक्षा उपलब्ध करून देत आहेत, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे. या वेळी केजरीवाल यांनी नीता अंबानी यांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुरक्षेचे वृत्तपत्रातील छायाचित्राचे कात्रणही ट्विटरवर टाकले आहे.

नीता अंबानी यांना ‘वाय’ दर्जाची सुरक्षा देण्यात आली असून त्या व्यवस्थेत १० सशस्त्र सुरक्षा कर्मचारी त्यांच्यासमवेत प्रवासात असणार आहेत.