तामिळनाडू विधानसभेच्या आगामी निवडणुकांमध्ये पीपल्स वेल्फेअर फ्रंटमध्ये सहभागी होऊन आम आदमी पक्ष रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. वायको यांच्या नेतृत्वातील एमडीएमके तसेच डाव्या पक्षांचा या आघाडीत समावेश आहे.
येत्या निवडणुकीसाठी पक्षाचे धोरण ठरवण्यासाठी पक्षांतर्गत चर्चा करण्याकरता येथे आलेले ‘आप’चे नेते सोमनाथ भारती यांनी हे संकेत दिले. भारती हे या मुद्यावरील चर्चेसाठी नंतर वायको यांना भेटण्याची शक्यता आहे.
तिरुमा वालावीन यांच्या नेतृत्वातील व्हीसीके, भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष या पक्षांचाही ‘पीपल्स वेल्फेअर फ्रंट’ मध्ये सहभाग आहे.
तामिळनाडूत करुणानिधी यांच्या नेतृत्वातील द्रमुक आणि जे. जयललिता यांच्या नेतृत्वातील अण्णाद्रमुक हे दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी असले, तरी भाजपही येथे पाय रोवण्याच्या तयारीत आहे. यातच तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून शिरकाव करण्याचा ‘आप’ चा प्रयत्न आहे.