आम आदमी पक्षामध्ये सर्वकाही ठिकठाक चालले असल्याची प्रतिक्रिया पक्षाचे निमंत्रक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी दिली. ‘आप’च्या राष्ट्रीय परिषदेत शनिवारी ‘महाभारत’ घडले. प्रा. योगेंद्र यादव व प्रशांत भूषण यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर रविवारी अंतर्गत लोकपाल पदावरून अॅडमिरल एल. रामदास यांचीही हकालपट्टी करण्यात आली. राष्ट्रीय परिषदेमध्ये योगेंद्र यादव यांचे समर्थक रमजान चौधरी यांना जोरदार मारहाणही करण्यात आली.
या सर्व पार्श्वभूमीवर सोमवारी माध्यमांनी केजरीवाल यांना पक्षामध्ये काय सुरू असल्याचे विचारल्यावर सर्वकाही ठिकठाक असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.
परिषदेचे सदस्य असलेल्या यादव व प्रशांत भूषण यांना परिषदेमध्ये येण्यापासून रोखण्यात आले होते. या नेत्यांच्या समर्थनात बोलणाऱ्या रमजान चौधरी यांना अरविंद केजरीवाल समर्थकांनी लाथाबुक्क्य़ांनी तुडवले. हा सर्व प्रकार होत असताना स्वत:च्या समर्थकांना चिथावणी देऊन अरविंद केजरीवाल यांनी सरळ काढता पाय घेतला होता. त्यानंतर बैठकीत घमासान झाले. आम आदमी पक्षावर अरविंद केजरीवाल यांनी वर्चस्व निर्माण केल्याचे निश्चित झाले आहे.