दिल्लीच्या जंतर मंतरवर आपचे नेते आणि कवी कुमार विश्वास यांनी आक्षेपार्ह भाषेत पक्षावर नाराजी व्यक्त केली. दिल्लीत महापालिकेसाठी भाजप, काँग्रेस आणि आप यांची प्रतिष्ठापणाला लागली असताना कुमार विश्वास यांच्या वक्तव्यामुळे दिल्लीच्या राजकारणात पालिका निवडणुकीनंतर पुन्हा खळबळ माजणार असल्याचे संकेत मिळत आहेत. कुमार विश्वास यांनी आक्षेपार्ह शब्दांचा वापर करत पक्षाला घरचा आहेर दिला. त्यामुळे कुमार विश्वास आम आदमी पार्टीला रामराम करण्याच्या मूडमध्ये असल्याची चर्चा आता जोर धरु लागली आहे. प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव यांनी पक्षाला रामराम ठोकल्यानंतर कुमार विश्वास पक्ष सोडणार असल्याच्या चर्चेला उधाण आल्याचे दिसते.

यापूर्वी कुमार विश्वास यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्यावर मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना सल्ला दिल्याचे पाहायला मिळाले. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन केजरीवाल सरकारला शहाणपण शिकवल्यानंतर ‘पार्टी भाड मे गई..’ असे म्हटल्यामुळे विश्वास पक्षाला जुमानत नसल्याचेच दिसते. त्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीनंतर आपचा आणखी एक शिलेदार केजरीवालांना अलविदा करणार का? हे लवकरच कळेल. दिल्ली पालिकेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या आहेत. आम आदमी पार्टी, काँग्रेस आणि भाजप या पक्षांमध्येच मुख्य लढत पाहायला मिळणार आहे. आपसाठी ही निवडणूक अग्निपरीक्षा असताना कुमार विश्वास निवडणूक प्रचारापासूनही दूर राहिले होते. त्यानंतर आता शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जंतर मंतरवरुन त्यांनी पक्षावर साधलेला निशाणा पक्षावर त्यांचा विश्वास राहिला नसल्याचे दाखवून देणाराच आहे.