दिल्लीच्या तीनही महापालिका एकतर्फी जिंकून भाजपची यशाची मालिका कायम

केवळ दोनच वर्षांपूर्वी दिल्ली विधानसभेमध्ये ७० पैकी ६७ जागा जिंकून अभूतपूर्व यश मिळविणाऱ्या आम आदमी पक्षाला (आप) दिल्लीतील तीन महापालिकांच्या निवडणुकांमध्ये बुधवारी  दारूण पराभवाच्या नामुष्कीला सामोरे जावे लागले. दहा वर्षांची ‘अँटी इन्कम्बन्सी’ (विरोधी जनमत) असतानाही भाजपने उत्तर, दक्षिण आणि पूर्व दिल्ली या तीन महापालिकांमध्ये पूर्वीपेक्षा अधिक जागा मिळवून यशाची मालिका कायम ठेवली. २७० पैकी भाजपला १८२ जागा, ‘आप’ला ४६, तर काँग्रेसला जेमतेम ३२ जागा पदरात पाडता आल्या. या पराभवाचे खापर ईव्हीएम यंत्रांवर फोडण्याचा आटापिटा आपने प्रारंभी केला; पण नंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपचे अभिनंदन केले.

२०१५ मधील विधानसभेतील लाजिरवाण्या पराभवाचा वचपा काढताना भाजपने ‘आप’ आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या लोकप्रियतेवर प्रश्नचिन्ह उमटविणारे यश मिळविले. पंजाब व गोव्यामधील पराभव, राजौरी गार्डनमधील विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये अनामत रक्कम जप्त होण्याची ओढविलेली वेळ यांच्या पाश्र्वभूमीवर केजरीवालांना मुळापासून हादरवून सोडणारे निकाल ‘ईव्हीएम’ यंत्रांतून उमटले. मतदानोत्तर चाचण्यांनी (एक्झिट पोल्स) असाच अंदाज वर्तविला होता. पण ‘आप’ने स्वत:च्या अंतर्गत सर्वेक्षणानुसार दोनशेच्या आसपास जागा मिळविण्याचा कयास जाहीर केला होता. तो पूर्णपणे फसला. खरे तर या स्थानिक निवडणुका होत्या. दहा वर्षांतील भाजपच्या कारभारांबाबत जनमत व्यक्त होण्याऐवजी हे निकाल ‘आप’च्या दोन वर्षांच्या कामगिरीवरील सार्वमत मानले जात आहेत.

या तीनही महापालिका भ्रष्ट कारभारांमुळे नेहमीच गाजल्या. जनतेची ही नाराजी नेमकी ओळखून भाजपने सर्वच्या सर्व १४२ नगरसेवकांना तिकिटे नाकारण्याचा टोकाचा धाडसी निर्णय घेतला आणि तो कसोशीने अमलात आणला. त्यामुळे नवे चेहरे आले, उत्तर प्रदेशमधील ‘फील गुड’ सोबतीला होताच. त्यामुळे ‘अँटी इन्कम्बन्सी’ला हरविणे सोपे गेले आणि तीनही महापालिकांमधील संख्या लक्षणीयरीत्या (१४२ वरून १८२) वाढली. पण महत्त्वाचे म्हणजे, एवढय़ा लाटेतही पक्षाच्या पाचही मुस्लीम उमेदवारांना यश मिळू शकले नाही! याउलट लागोपाठचे पराभव, विविध वाद, निवडणुकीच्या तोंडावर झालेले गंभीर आरोप यामुळे ‘आप’चे कार्यकर्ते कमालीचे हताश झाले होते. त्याचा फायदा भाजपला मोठय़ा प्रमाणात आणि काँग्रेसला काही प्रमाणात झाला.

माकन यांचा राजीनामा

२०१५ मधील मतांच्या तुलनेत यंदा काँग्रेसला वाढीव मते मिळाली, पण तरीही पराभवाची जबाबदारी स्वीकारून प्रदेशाध्यक्ष अजय माकन आणि दिल्लीचे प्रभारी पी. सी. चाको यांनी पदाचे राजीनामे दिले. माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी अपेक्षेप्रमाणे पराभवाचे खापर माकन यांच्यावरच फोडले. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या संयुक्त जनता दलाने १०३ उमेदवार उभे केले होते. त्यासाठी नितीशकुमारांनी सभा घेतल्या, पण त्याचा काहीच प्रभाव पडला नाही. ‘आप’मधून फुटून ‘स्वराज्य’ पक्षाची स्थापना करणाऱ्या प्रा. योगेंद्र यादव व विधिज्ञ प्रशांत भूषण यांनाही मतदारांनी स्पष्टपणे नाकारले. याशिवाय बसपा, समाजवादी पक्ष, भारतीय राष्ट्रीय लोकदल, राष्ट्रीय लोकदल आदी उत्तर भारतीय पक्षांचीसुद्धा डाळ शिजली नाही.

  • उत्तर आणि पूर्व दिल्लीतील प्रत्येकी एका वॉर्डामधील निवडणूक उमेदवाराच्या निधनाने पुढे ढकलली आहे. त्यामुळे २७२ ऐवजी २७० वार्डात मतदान झाले.
  • पक्षांना मिळालेल्या जागांपुढील कंसातील आकडे हे २०१२ मधील जागांचे आहेत. तेव्हा ‘आप’ची स्थापना झालेली नव्हती.
  • भाजपवर विश्वास दाखविल्याबद्दल मी दिल्लीकरांचा ऋणी आहे. तीनही महापालिका जिंकण्याचे श्रेय भाजप कार्यकर्त्यांनी केलेल्या कठोर मेहनतीला आहे.. –   नरेंद्र मोदी, पंतप्रधान
  • विजयाबद्दल भाजपचे अभिनंदन करतो. दिल्लीच्या प्रगतीसाठी या तीन महापालिकांच्या सहकार्याने माझे सरकार काम करेल.. –  अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री  
  • नकारात्मक आणि बहानेबाजी करणारे राजकारण चालणार नसल्याचा संदेश दिल्लीच्या जनतेने दिला आणि त्याचबरोबर मोदींच्या नेतृत्वावरही विश्वास दाखविला.. अमित शहा, भाजप अध्यक्ष
  • भाजपबद्दलच्या नाराजीपेक्षा आपबद्दल दिल्लीकरांमध्ये जास्त चीड होती. म्हणून तर महापालिकेच्या निवडणुकीत त्यांनी मुख्यमंत्र्यांना नाकारले आणि पंतप्रधानांना निवडले.. प्रा. योगेंद्र यादव, स्वराज्यचे अध्यक्ष
  • ईव्हीएम यंत्रांमध्ये काही तरी नक्कीच गडबड आहे.. जर विरोधक एकत्र आले नाही तर दिल्लीसारखेच निकाल येत राहतील. लालूप्रसाद यादव, राष्ट्रीय जनता दल अध्यक्ष

पराभवाचे खापर..

मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाज खरे ठरण्याची भीती खरी ठरल्यानंतर बुधवारी सकाळपासूनच आपचे झाडून सर्व नेते ईव्हीएम यंत्रांविरुद्ध गरळ ओकत होते. पराभव मान्य करण्याऐवजी केविलवाण्या चेहऱ्यांनी ईव्हीएमची लाट असल्याची तिरकस टिप्पणी करत होते. सारवासारव करताना उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया तर भलतेसलते आरोप करीत होते. दहा वर्षे भाजपने तीनही महापालिका लुटल्या. पण तरीदेखील दिल्लीकर एवढे बहुमत भाजपला देत असल्यावर विश्वासच बसत नाही. १०० टक्के ईव्हीएममध्ये घोटाळा आहे. अशा आशयाची टीका आप नेते करीत होते.

मराठी नेत्यांचा वाटा

भाजपच्या या विजयामध्ये मराठी नेत्यांचा मोठा सहभाग राहिला. राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू हे दिल्लीचे प्रभारी आहेत, तर दुसरे उपाध्यक्ष व खासदार विनय सहस्रबुद्धे यांच्याकडे निवडणूक व्यवस्थापन समितीची सूत्रे होती. जाजू यांच्यासाठी हे सलग दुसरे यश आहे. जाजू, सहस्रबुद्धे यांच्या जोडीला महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा व सध्या महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा असलेल्या विजया रहाटकर आणि युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा खासदार पूनम महाजन यांचा प्रचारात सक्रिय सहभाग होता. सांगलीचे खासदार संजयकाका पाटील यांनी मराठीबहुल भागामध्ये सभा घेतल्या होत्या.

केजरीवाल फक्त बोलतात, करीत काहीच नाही. त्यांची कृती शून्य आहे. दिल्ली शहर एक ‘मॉडेल’ म्हणून विकसित केल्यावर अन्य ठिकाणी आपले लक्ष्य वळवावे, असा सल्ला मी त्यांना दिला होता. त्यांनी तो ऐकला असता, तर आज अशी परिस्थिती आली नसती. सत्तेची नशा मिळविण्यासाठी ते मला गुरू मानत असल्याचे भांडवल करीत होते. त्यांच्यापासून मी लांब झालो हे बरे झाले  अण्णा हजारे

untitled-2