शिसोदियांच्या नेतृत्वाखाली ‘आप’च्या आमदारांचे मोर्चा नाटय़

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाकडे शरणागती पत्करण्यासाठी निघालेले उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह ५२ आमदारांना पोलिसांकडून अटक करण्यात आली, मात्र काही तासांनंतर त्यांची सुटका करण्यात आली.

अतिसुरक्षित परिसरात मोर्चा काढून आदेशाचा भंग केल्यामुळे ताब्यात घेण्यात आले. कायद्याचा भंग करणाऱ्या कोणावरही कारवाई करण्यात येईल अशी भूमिका घेत पोलिसांनी या  आमदारांना रेस कोर्स मेट्रो स्टेशन येथे ताब्यात घेतले.  काही कालावधीनंतर या आमदारांची सुटका करण्यात आली.

भाजप आणि आम आदमी पक्ष यांच्यातील मतभेद संपण्याची चिन्हे नाहीत. गाझीपूर मार्केटमधील व्यापाऱ्यांनी सिसोदिया यांच्या विरोधात तक्रार केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सिसोदिया पंतप्रधानांच्या निवासस्थानी शरणागती पत्करतील, असे सांगितले होते.

आमदार दिनेश मोहनिया यांना लैंगिक छळाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळत त्यांची रवानगी सोमवापर्यंत तिहार कारागृहात केली आहे. मोदींनी आम्हाला दिल्लीच्या जनतेसाठी कार्य करू द्यावे. आम्ही दोषी आढळल्यास कारवाई करावी, मात्र विकासकामांमध्ये अडथळा आणू नका, असे सिसोदिया म्हणाले. केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी आमदारांचे हे नाटक असल्याचे सांगत टीका केली आहे.