‘अतुल्य भारत’चा ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर म्हणून आमिर खानला हटविण्यात आल्यानंतर लगेचच त्याला रस्ते सुरक्षा अभियानातूनही वगळण्यात आले आहे. असहिष्णुतेबाबत केलेले वक्तव्य आमिरला महागात पडल्याचेच हे चित्र आहे.
सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सूचनेवरून आमिरची डिसेंबर २०१४ रोजी रस्ते सुरक्षा मोहिमेसाठी ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून निवड करण्यात आली होती.
आमिरच्या ‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमातील ‘रस्ते अपघात की खून?’ या प्रकरणात रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री गडकरी यांनी स्वत: आमिरशी संवाद साधला होता.
आमिरने या प्रकरणातून महत्त्वाचा सामाजिक विषय विस्तृतपणे मांडल्याचे सांगत गडकरी यांनी आमिरचे कौतुक केले होते.
यानंतर केंद्र सरकारने रस्ते सुरक्षा अभियानाला सुरुवात करून आमिरची ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता आमिरला तडकाफडकी हटविण्यात आले आहे.