अभिनेता आमिर खान यांनी वाढत्या असहिष्णुतेच्या पाश्र्वभूमीवर केलेल्या वक्तव्यामुळे येत्या २६ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सत्ताधाऱ्यांची अडचण वाढण्याची शक्यता आहे. बिहार निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पुरस्कार वापसी, दादरीसारख्या प्रकरणांवर भाजपला स्पष्टीकरण देताना नाकीनऊ आले होते. केंद्रातील मंत्र्यांनी अनेक वादग्रस्त विधाने करून पक्षाच्या अडचणीत भर टाकली होती. आता आमिर खान यांच्या विधानामुळे हिवाळी अधिवेशन दणाणून सोडण्याची रणनीती काँग्रेसने आखली आहे. अधिवेशनाचे प्रारंभीचे दोन दिवस (२६ व २६ नोव्हेंबर) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार व कार्यास समर्पित करण्यात आले आहेत. या दोन दिवसांत पुन्हा एकदा असहिष्णुतेच्या मुद्दय़ावरून सरकारला जाब विचारण्याच्या तयारीत काँग्रेस नेते आहेत. त्यानंतर मात्र पुढील दिवसांमध्ये कामकाज ठप्प करण्यात येईल.

काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी यासंबंधी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी चर्चा केली. दादरी प्रकरण व त्यानंतर केंद्रीय मंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यांची यादीच काँग्रेस नेत्यांनी तयार केली आहे. त्यावर सरकारला जाब विचारला जाईल. प्रारंभीचे दोन दिवस चर्चेनंतर मात्र विरोधकांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच घेरण्याची तयारी चालवली आहे. दादरी प्रकरण, हरयाणातील दलित जळीतकांड प्रकरण व आता खुद्द आमिर खान यांनी केलेल्या विधानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच स्पष्टीकरण द्यावे लागेल, अशी मागणी आनंद शर्मा यांनी केली.
देशातील वातावरणाची धोक्याची सूचना सांगताना पत्नी किरण हिने देश सोडून जाण्याचा पर्याय समोर ठेवला होता, असे आमिर खान यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ समूहाच्या ‘रामनाथ गोयंका पत्रकारिता’ पुरस्कार वितरण सोहळ्यात सांगितले होते. या कार्यक्रमात केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, संसदीय कामकाजमंत्री व्यंकय्या नायडू, संसदीय कामकाज राज्यमंत्री राजीव प्रताप रूडी उपस्थित होते. प्रश्नोत्तराच्या तासाला एकाही नेत्याने आमिर यांना विचारणा केली नाही. आमिर खान यांच्या विधानामुळे विरोधकांना सरकारविरोधात भक्कम मुद्दा मिळाल्याने भाजप गोटात चर्चेला सुरुवात झाली आहे. बुधवारी आयोजित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीत असहिष्णुतेच्या मुद्दय़ावर संसदेत विरोधकांचा सामना कसा करावा, याची रणनीती आखण्यात येणार आहे.