‘रामनाथ गोएंका एक्सलन्स इन जर्नालिझम’ पुरस्कार सोहळ्यात आमिर खानच्या भावना
देशातील वाढत्या असहिष्णुतेविरोधात आवाज उठविणाऱ्या बुद्धिवंतांच्या यादीत आता अभिनेता आमिर खानही दाखल झाला आहे. मी देशातील असहिष्णुतेच्या वाढत्या घटनांमुळे चिंतीत झालो असून, माझी पत्नी किरणने देश सोडण्याविषयीही सुचवले होते, अशा शब्दांत आमिरने आपले दुख व्यक्त केले. आपली निराशा व्यक्त करण्यासाठी प्रतिभावंत मंडळींसाठी पुरस्कारवापसी हा एक मार्ग असू शकतो, अशा शब्दांत आमिरने पुरस्कार परत करणाऱ्या मंडळींनाही यावेळी पाठिंबा दिला.

‘रामनाथ गोएंका एक्सलन्स इन जर्नालिझम’ पुरस्कारांच्या वितरणप्रसंगी आयोजित कार्यक्रमात आमिरने यासंदर्भात मन मोकळे केले. तो म्हणाला की, या देशाचे नागरिक म्हणून आपण वृत्तपत्रामध्ये बातम्या वाचत असतो. काय घडते आहे, ते पाहतो. जे घडते आहे, त्यामुळे मी चिंतीत झालो, हे नाकबूल करणार नाही. अनेक घटनांनी मी व्यथित झालो आहे. गेल्या सहा ते आठ महिन्यांपासून असुरक्षिततेची भावना वाढते आहे. आपण भारत सोडू या का, असा प्रश्न पत्नी किरणने मला विचारला. हा विचार तिच्यासाठी फारच मोठा आहे. तिच्या मुलाची तिला काळजी वाटते आहे. आमच्या सभोवताली काय वातावरण असेल, याचीही तिला भीती वाटते. तिला रोजचे वृत्तपत्र उघडण्याचीही भीती वाटते.

कुठल्याही समाजात सुरक्षेची भावना असणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन करताना आमिर खान याने राजकारण्यांवरही निशाणा या वेळी साधला. आपली काळजी घेण्यासाठी आपण निवडून दिलेल्या लोकांनी खंबीरपणे पावले उचलणे अपेक्षित असते. पण ते होत नसल्यामुळे असुरक्षिततेची भावना वाढत चालली असल्याचे त्याने सांगितले.

त्यामुळेच निराश आणि अस्वस्थ होऊन साहित्यिक, इतिहासकार, संशोधक निषेध नोंदवीत असल्याचे मत आमिरने व्यक्त केले. उत्तर प्रदेशातील दादरी प्रकरणानंतर केलेल्या राजकीय वक्तव्यांबद्दलही त्याने यावेळी तीव्र संताप व्यक्त केला.