देशात असहिष्णुतेचे वातावरण असल्याचे सांगून अभिनेता आमीर खान लोकांना घाबरवण्याचे काम करतो आहे. देशाची प्रतिमा मलिन करण्याचा हा कट असल्याचा आरोप भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसेन यांनी मंगळवारी मुंबईत केला.
देशातील असहिष्णुतेच्या वाढत्या घटनांमुळे चिंतीत झालो असून, माझी पत्नी किरणने देश सोडण्याविषयीही सुचवले होते, असे आमीरने सोमवारी ‘रामनाथ गोएंका एक्सलन्स इन जर्नालिझम’ पुरस्कारांच्या वितरणप्रसंगी आयोजित कार्यक्रमात म्हटले होते. त्यावर विविध व्यक्ती, पक्ष, संघटनांकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. शाहनवाज हुसेन मुंबईतील पत्रकार परिषदेत म्हणाले, देशानेच तुला स्टार केले हे विसरू नकोस. १२१ कोटी लोकसंख्या असलेल्या देशात छोट्या गोष्टी घडत असतात. मात्र, त्यामुळे देशाची प्रतिमा बदनाम करणे योग्य नाही.
आमीर खानच्या विधानानंतर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेल्या ट्विटचा संदर्भ देऊन ते म्हणाले, त्या ट्विटवरून देशाची प्रतिमा मलिन करण्यासाठी हा कट रचला जात असल्याचे स्पष्ट होते. ज्या पक्षावर अनेक दंगली भडकवल्याचे आरोप आहेत. त्यांनी इतरांना सहिष्णुता शिकवू नये, असाही टोला त्यांनी लगावला.