आम आदमी पक्षात सुरू असलेला अंतर्गत कलह शनिवारी थेट हाणामारीवर आला. राष्ट्रीय परिषदेत प्रा. योगेंद्र यादव व प्रशांत भूषण यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. हा निर्णय घोषित झाल्यानंतर बैठकीच्या स्थानासमोर या नेत्यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी केली. विशेष म्हणजे या परिषदेचे सदस्य असलेल्या प्रा. यादव व प्रशांत भूषण यांना बैठकीत येण्यापासून रोखण्यात आले. या नेत्यांच्या समर्थनात बोलणाऱ्या रमजान चौधरी यांना अरविंद केजरीवाल समर्थकांनी लाथाबुक्क्य़ांनी तुडवले. हा सर्व प्रकार होत असताना स्वत:च्या समर्थकांना चिथावणी देऊन अरविंद केजरीवाल यांनी सरळ काढता पाय घेतला. त्यानंतर बैठकीत घमासान झाले. दिवसभरातील या नाटय़मय घडामोडीनंतर आम आदमी पक्षावर अरविंद केजरीवाल यांनी वर्चस्व निर्माण केल्याचे निश्चित झाले आहे. या घटनाक्रमास लोकशाहीविरोधी नाव देत प्रा. यादव यांनी ‘आप’च्या राष्ट्रीय परिषदेत लोकशाहीची हत्या झाल्याचा गंभीर आरोप केजरीवाल यांचे नाव न घेता केला.
गेल्या आठवडाभरापासून चव्हाटय़ावर आलेल्या पक्षांतर्गत संघर्षांने आज भलतेच वळण घेतले. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे आगमन होताच बैठक सुरू झाली. साधारण तासाभरानंतर केजरीवाल बैठकीतून बाहेर पडले. त्यांच्या अनुपस्थितीत गोपाल राय यांनी बैठकीची सूत्रे हाती घेत यादव व भूषण यांची हकालपट्टी करण्याचा प्रस्ताव मांडला.
या प्रस्तावावर केजरीवाल यांचे विश्वासू व उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी मतदान घेतले. त्यानंतर हा प्रस्ताव मंजूर झाल्याची घोषणा सिसोदिया यांनीच केली. हे वृत्त पसरताच बाहेर जमलेल्या यादव समर्थकांमध्ये खळबळ माजली. हकालपट्टीच्या प्रस्तावास विरोध करणाऱ्यांना बैठकीत मारहाण केल्याचा आरोप यादव यांनी केला. तर काल प्रसिद्ध झालेल्या स्टिंगमध्ये केजरीवाल यांनी केलेली हुकूमशाहीचे समर्थन करणारी वक्तव्ये आज प्रत्यक्ष अनुभवायला मिळाली, अशी घणाघाती टीका प्रशांत भूषण यांनी केली.  
प्रशांत भूषण व योगेंद्र यादव यांच्यासह प्रा. आनंद कुमार व अजित झा यांचीदेखील हकालपट्टी करण्यात आली. हे दोन्ही नेते प्रा. यादव यांचे समर्थक मानले जातात. या सर्व घटनाक्रमादरम्यान केजरीवाल अनुपस्थित होते, हे मात्र विशेष. हा सर्व प्रकार कुणाच्या इशाऱ्यावर झाला हे सर्वाना ठाऊक असल्याचे सूचक वक्तव्य करीत भूषण यांनी अप्रत्यक्षपणे केजरीवाल यांच्यावर शरसंधान केले. आमच्यासह अनेकांना बैठकीत येण्यापासून रोखले, असा आरोप प्रा. यादव यांनी केला.

संजय सिंह यांनी आरोप फेटाळले
आपचे नेते संजय सिंह यांनी मात्र प्रशांत भूषण व योगेंद्र यादव यांच्या आरोपांचे खंडन केले. ते म्हणाले की, राष्ट्रीय परिषदेच्या ३११ पैकी २७४ सदस्य उपस्थित होते. त्यापैकी केवळ चार सदस्यांनी प्रस्तावास विरोध केला होता. उर्वरित सदस्यांनी हात उंचावून प्रस्तावाचे समर्थन केले. त्यानंतरच प्रस्ताव मंजूर झाला. उभय नेते खोटे आरोप करून अरविंद केजरीवाल यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप संजय सिंह यांनी केला. बैठकीत हाणामारी झाली नाही. आमच्याविरोधात खोटे वृत्त पसरवले जात आहे. कधी नेत्यांचे फोन टॅप केले जातात, तर कधी पक्षाच्या नेत्यांना बदनाम केले जाते. पक्ष फोडण्यासाठी हे आरोप होत असल्याचे स्पष्टीकरण आशीष खेतान यांनी दिले. राष्ट्रीय परिषदेचे ध्वनिचित्रमुद्रण केले आहे. त्यातून सत्य बाहेर येईल, असा दावा त्यांनी केला.

नाटय़मय घडामोडी
२७ मार्च
*यादव व भूषण यांना लाथ मारून हाकलून देऊ, असे म्हणणाऱ्या अरविंद केजरीवाल यांचे स्टिंग प्रसारित-
*यादव व भूषण यांच्याविरोधात केजरीवाल समर्थक खेतान, संजय सिंह यांची वक्तव्ये
२८ मार्च
*दिल्लीत पक्षाची राष्ट्रीय परिषद
 परिषदेत जाण्यापासून यादव व भूषण यांना रोखले; त्यांच्या समर्थकांना लाथाबुक्क्य़ांनी तुडवले
*परिषदेत तासभर थांबून भाषण केल्यानंतर केजरीवाल निघून गेले; अनुपस्थितीत गोपाल रॉय बैठकीचे अध्यक्ष राहतील अशी घोषणा त्यांनी केली. गोंधळातच सिसोदिया यांनी यादव व भूषण यांच्या हकालपट्टीचा प्रस्ताव मंजूर झाल्याची घोषणा केली.