दिल्ली महापालिका निवडणुकीपूर्वीच अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्षात अंतर्गत वादास सुरूवात झाली आहे. या वादामुळे पक्षात उभी फूट पडण्याची शक्यता राजकीय तज्ज्ञांनी वर्तवली आहे. बवाना येथील पक्षाचे आमदार वेदप्रकाश भाजपमध्ये सहभागी झाल्यानंतर आपच्या आणखी चार आमदारांचे काँग्रेसबरोबर बोलणे सुरू असल्याचे वृत्त इकॉनॉमिक टाइम्सने दिले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून आपचे आणखी ३१ आमदारही पक्ष सोडू शकतात, असेही इकॉनॉमिक टाइम्सने म्हटले आहे. नुकताच झालेल्या गोवा आणि पंजाब निवडणुकीत पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला होता.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार किमान ४ आमदारांची काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा केली आहे. या आमदारांनी काँग्रेसमध्ये सहभागी होण्यावरून ही बैठक घेतली होती. या आमदारांनी आणखी ३१ आमदारांच्या पाठिब्यांचेही आश्वासन दिले आहे. काँग्रेसमध्येही याबाबत चर्चा सुरू आहे. मात्र, याबाबत दिल्ली प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजय माकन आणि पक्षाचे दिल्ली प्रभारी आणि सरचिटणीस यांनी यावर बोलण्यास नकार दिला आहे. दिल्लीमध्ये आमपचे ६७ आमदार निवडून आले होते. यातील अनेक आमदारांनी आता बंडखोरी केली आहे. देवेंद्र सहरावत, पंकज पुष्कर, माजी मंत्री संदीप कुमार आणि असीम अहमद खान यांचा यामध्ये समावेश होता. काँग्रेसमधील अंतर्गत सूत्रांनी यातील काही आमदारांबरोबर चर्चा सुरू असल्याचा दावा केला आहे. प्रयत्न करूनही या आमदारांची प्रतिक्रिया मिळू शकली नसल्याचे इकॉनॉमिक टाइम्सने म्हटले आहे.
दरम्यान, ‘आप’मध्ये माझी घुसमट सुरू होती. आपला विधानसभा निवडणुकीत दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात अपयश आले आहे. आपमध्ये सध्याच्या घडीला पक्षनेतृत्त्वावर नाराज असलेले तब्बल ३५ आमदार असल्याचेही वेद प्रकाश यांनी म्हटले.गेल्या दोन वर्षात बवाना मतदारसंघात ‘आप’ सरकारने कोणतीही विकास कामे केलेली नाहीत. ‘आप’ सरकारला लोकांच्या समस्या समजत नसल्याची टीकाही वेद प्रकाश यांनी केली. २०१५ सालच्या विधानसभा निवडणुकीत वेद प्रकाश बवाना मतदारसंघातून ५१ हजाराच्या मताधिक्याने निवडून आले होते. वेद प्रकाश यांनी विधानसभा सदस्यत्त्वाचा राजीनामा दिल्याने आता या जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे.