आम आदमी पक्षाच्या सभेत राजस्थानमधील शेतकरी गजेंद्र सिंह या शेतकऱ्याने आत्महत्या केली होती. त्यानंतर पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांच्यावर चौफेर टीका झाली होती. त्यानंतर आता दिल्लीतील आपच्या सरकारने शेतकऱ्यांच्या देण्यात येणाऱ्या नुकसानभरपाईच्या योजनेला गजेंद्र सिंह यांचे नाव दिले जाणार आहे. तसेच गजेंद्र यांना हुतात्मा ठरवले जाईल व त्यांच्या वारसांना नोकरी देण्याची कुटुंबीयांची मागणी सरकारने मान्य केली आहे.
आपचे ज्येष्ठ नेते संजय सिंह यांनी शुक्रवारी राजस्थानमधील दौसा जिल्ह्य़ातील नानगल जमरवाडा येथे जाऊन गजेंद्र सिंह यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. त्यानंतर कुटुंबीयांच्या मागण्यांबाबत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गजेंद्र यांच्या बंधूंना चर्चेला बोलावले होते. त्या वेळी गजेंद्र यांना हुतात्मा ठरवणे व कुटुंबीयांना सरकारी नोकरीची मागणी मान्य केली. तसेच पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याबाबतच्या योजनेला गजेंद्र यांचे नाव दिले जाणार असल्याची घोषणा दिल्ली सरकारने केली.