दिल्लीमध्ये सनदी अधिकाऱयांच्या बदली आणि नियुक्तीच्या नावाखाली एक मोठा व्यवसाय सुरू असून, तो बंद करण्यासाठी आम आदमी पक्षाच्या सरकारने प्रयत्न सुरू केल्यामुळेच या अधिकाऱयांकडून आप सरकारवर टीका करण्यात येत असल्याचे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी गुरुवारी म्हटले. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि तेथील नायब राज्यपाल नजीब जंग यांच्यातील संघर्षामध्ये सनदी अधिकाऱयांना मिळणाऱया वागणुकीबद्दल अधिकारीवर्गाने तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली होती. त्या पार्श्वभूमीवर सिसोदिया यांनी सनदी अधिकाऱयांवरच निशाणा साधला.
ते म्हणाले, गेल्या सरकारांमध्ये अधिकाऱयांची नियुक्ती आणि बदलीच्या नावाखाली व्यवसाय चालविणारेच आता आम्हाला अधिकाऱयांना प्रेरणा मिळेल, असे वागण्याचा सल्ला देत आहेत. आपल्या पदाचा गैरवापर करणाऱया अधिकाऱयांचेच खच्चीकरण होत असते. दिल्लीमध्ये अधिकाऱयांची बदली आणि नियुक्ती याच्या नावाखाली मोठा व्यवसाय सुरू आहे. गेल्या तीन महिन्यात तो थांबविण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. आम्ही सत्तेवर आल्यापासून अधिकाऱयांची गुणवत्ता लक्षात घेऊनच बदल्या आणि नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळेच हा व्यवसाय चालविणारे अधिकारी आम्हाला विरोध करताहेत. अधिकाऱयांची नियुक्ती आणि बदलीच्या नावाखाली व्यवसाय करणारे कोट्यवधी रुपयांची उलाढाल करतात, असाही आरोप त्यांनी केला.