दिल्ली विधानसभा निवडणूक प्रचाराच्या धामधुमीत पहिली सभा घेणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम आदमी पक्षाचे समन्वयक अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. केजरीवाल सत्ता सोडून पळून गेले. त्यांनी तुमच्या पाठीत खंजीर खुपसला, अशी टीका मोदी यांनी केली. मोदी यांच्या या वाक्यानंतर जनसमुदायात ‘मोदी-मोदी’चा गजर सुरू झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केजरीवाल यांना लक्ष्य केल्याने आम आदमी पक्षच भाजपसमोरचे मोठे आव्हान असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मोदी सभास्थानी हेलिकॉप्टरने दाखल झाले. लोकसभा निवडणुकीत दिल्लीच्या सातही जागांवर भाजप उमेदवारांना विजयी केल्याचा उल्लेख मोदींनी भाषणादरम्यान चार वेळा केला. त्यासाठी त्यांनी दोनदा जनसमुदायाचे आभार मानले. मोदी म्हणाले की, मी केवळ सत्ता उपभोगण्यासाठी दिल्लीत आलो नाही. मला तुमची सेवा करायची आहे. दिल्लीच्या गल्लीबोळाचा विकास करण्यासाठी दिल्लीत स्थिर सरकारची गरज आहे. विकासासाठी भाजपला मत देण्याचे आवाहन मोदींनी केले. लोकसभा निवडणूक लढवताना पंतप्रधानपदाची स्वप्ने पाहणाऱ्या केजरीवाल यांना वाराणसीत पराभूत व्हावे लागले. निवडणूक जिंकलो अथवा हारलो तरी तुमच्या सेवेसाठी येत राहीन, असे आश्वासन केजरीवाल यांनी वाराणसीच्या मतदारांना दिले होते. प्रत्यक्षात निवडणूक संपल्यावर केजरीवाल वाराणसीला फिरकले नाहीत. केजरीवाल यांनी दिल्लीत सत्ता अर्धवट सोडून पळ काढला. सर्वाधिक जागांवर अमानत रक्कम जमा झालेला राजकीय पक्ष असा विक्रम एका राजकीय पक्षाच्या नावावर लोकसभा निवडणुकीनंतर जमा झाल्याचा चिमटा मोदी यांनी नाव न घेता ‘आप’ला काढला. आपने दिल्लीकरांचा विश्वासघात केला आहे. दिल्लीकरांना आपने मोठमोठाली स्वप्ने दाखवली. दिल्लीकरांनीदेखील त्यावर विश्वास ठेवला. परंतु आता लोक फसणार नाहीत. केंद्राशी समन्वय साधून दिल्लीचा  विकास करू, दिल्लीला जागतिक  दर्जाच्या राजधानीचे शहर बनवू, अशी आश्वासने त्यांनी दिली.