आम आदमी पक्षाचे दिल्लीमधील आमदार अमानतुल्ला खान यांना  एका महिलेस बलात्कार आणि हत्या करण्याची धमकी दिल्याप्रकरणी रविवारी अटक करण्यात आली. दिल्लीमधील वीजपुरवठ्याच्या मुद्यावरुन एका तरुणास या महिलेवर बलात्कार करण्याची धमकी देण्याचे आदेश खान यांनी दिल्याची तक्रार संबंधित महिलेने नोंदविली होती. दरम्यान, खान यांना अटक करण्यामागे भारतीय जनता पक्षाचे  राजकारण असल्याची टीका आपकडून करण्यात आली आहे. मोदींकडून आणखी एका आप आमदारास अटक करण्यात आले आहे, अशी प्रतिक्रिया केजरीवाल यांनी दिली आहे. दिल्लीतील दक्षिण पूर्व पोलीस प्रमुख राजीव रंजन यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमानतुल्ला यांना सकाळी अटक करण्यात आली असून कलम ५०६ आणि ५०९ च्या कायद्याअंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ३५ वर्षीय महिलेने जामिया नगर पोलीस ठाण्यामध्ये १० जुलै रोजी अमानतुल्ला यांच्या विरोधात तक्रार नोंदविली होती. एका तरुणाने महिलेच्या घरी जाऊन अश्लिल शिवीगाळ करत धमकी दिली होती. य़ा तरुणाने महिलेला खान यांचे नाव सांगून धमकी दिल्याचे महिलेने म्हटले होते. दरम्यान, ज्या दिवशी हा सर्व प्रकार घडला त्यावेळी  मी मेरठमध्ये होतो, असे खान यांनी म्हटले होते.