भाजप व आम आदमी पक्ष यांच्यातील संघर्ष संपण्याची चिन्हे नाहीत. दिल्लीतील आम आदमी पक्षाचे आमदार दिनेश मोहनिया यांना विनयभंग व लैंगिक छळाच्या आरोपाखाली शनिवारी अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळत सोमवापर्यंत तिहार कारागृहात त्यांची रवानगी केली आहे. दरम्यान, आमदाराच्या अटकेनंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत, दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणीबाणीसदृश परिस्थिती निर्माण केल्याचा आरोप केला आहे.

मोहनिया दिल्ली जल मंडळाचे अध्यक्ष आहेत. कार्यालयात पत्रकारांशी बोलत असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. वाहिन्यांच्या कॅमेऱ्यासमोर आमदाराला अटक करून पंतप्रधान काय संदेश देऊ पाहत आहेत, अशी विचारणा केजरीवाल यांनी केली आहे. सोमवापर्यंत मोहनिया यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. अपमान करण्यासाठीच अटक केल्याचा मोहनिया यांचा दावा न्यायालयाने फेटाळून लावला.

मोहनियांच्या विरोधात दोन आरोप

पाण्याच्या समस्येबाबत काही महिला तक्रार घेऊन आल्या होत्या. त्या वेळी त्यांच्याशी गैरवर्तन केल्याचा मोहनिया यांच्यावर आरोप आहे.  २३ जून रोजी ही तक्रार करण्यात आली आहे. संगमविहार येथून मोहनिया निवडून आले आहेत. याखेरीज त्यांच्याविरोधात गोविंदपुरा पोलीस ठाण्यात ६० वर्षीय व्यक्तीने मारहाण केल्याची तक्रार शुक्रवारी दाखल केली आहे. दिल्लीत  आम आदमी पक्षाचे सरकार आल्यापासून अटक झालेले मोहनिया हे आठवे सत्ताधारी आमदार आहेत.