दिल्ली विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय प्राप्त केल्यानंतर आम आदमी पक्षाचे (आप) सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल येत्या १४ फेब्रुवारी रोजी रामलीला मैदानावर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधीला ‘आप’कडून पंतप्रधान नरेंद्र मोदींना आमंत्रित केले जाणार आहे. त्यासाठी गुरूवारी सकाळी अरविंद केजरीवाल मोदी यांची भेट घेतील. तत्पूर्वी आज सकाळी केजरीवाल आणि मनिष सिसोदिया यांनी केंद्रीय मंत्री वेंकय्या नायडू यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान, केजरीवाल यांनी दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याची मागणी केल्याचे समजते.
दिल्ली विधानसभेची ही लढाई अरविंद केजरीवाल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोन दिग्गज नेतृत्वांमधील लढाई होती. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मोदी आणि भाजप यांच्याकडून केजरीवालांवर वैयक्तिक टीकाही करण्यात आली होती. त्यानंतर मंगळवारी जाहीर झालेल्या निवडणुकीच्या निकालानंतर आपने भाजपला पूर्णपणे धूळ चारल्याचे स्पष्ट झाले. मात्र, आता निकालानंतर आपने हे वैर विसरत, मोदींना शपथविधीसाठी आमंत्रित करण्याचा निर्णय आपने घेतला आहे. आम आदमी पक्षाचे प्रवक्ते आशिष खेतान यांनी याबद्दलची माहिती दिली. दरम्यान, या सोहळ्यासाठी सोनिया गांधी, राहुल गांधी, किरण बेदी, वेंकय्या नायडू आणि राजनाथ सिंह यांनाही निमंत्रित करणार असल्याचे समजते.