देशाचे पहिले नागरिक असलेल्या राष्ट्रपतींच्या कुटुंबातील व्यक्तीने – प्रणब मुखर्जी यांचा पुत्र अभिजीत मुखर्जी यांनी दिल्लीमध्ये झालेल्या सामूहिक बलात्काराच्या निषेधार्थ होणा-या आंदोलनांबाबत केलेल्या वक्तव्यावरून वादळ उठले आहे. त्यामुळे त्यांना आपले शब्द मागे घेण्यास भाग पाडले जात आहे. या विधानानंतर अभिजीत मुखर्जी यांच्या भगिनींनी आपल्या बंधुंच्या वक्तव्यावर माफीही मागितली आहे.
नटून-थटून, भरमसाठ मेकअप करून डिस्कोमध्ये जाणं आणि त्यानंतर मेणबत्त्या घेऊन निदर्शनं करणं, ही आजची फॅशन झाली आहे, असं वादग्रस्त विधान राष्ट्रपती पुत्र खासदार अभिजीत मुखर्जी यांनी केलं आहे. त्यांच्या या वादग्रस्त विधानाने चांगलीच खळबळ माजली आहे. मेणबत्त्या घेऊन निदर्शनं करणाऱ्यांना वास्तवाची खरचं जाण असते का, असा सवालही अभिजीत मुखर्जी यांनी उपस्थिती केला आहे.
विद्यार्थी जीवन काय असतं, हे मला ठाऊक आहे. मेकअप करून आंदोलनात सहभागी झालेल्या महिला या विद्यार्थी आहेत का? याबाबतही मुखर्जी यांनी  शंका व्यक्त केली आहे. दरम्यान मुखर्जी यांच्या या व्यक्तव्यामुळे देशातील अनेक महिला संघटना नाराज झाल्या आहेत.  
राजधानीत सामूहिक बलात्कारची बळी ठरलेल्या ‘त्या’ पीडित तरुणीची प्रकृती बुधवारी अधिकच खालावली. त्यामुळे विशेष विमानाने तिला अधिक उपचारासाठी बुधवारी रात्री तातडीने सिंगापूर येथे हलवण्यात आले आहे.