निवडून आलेला उमेदवार आणि प्रचारादरम्यान लावण्यात आलेल्या त्याच्या पोस्टरवरील फोटोत फरक असल्याचे दिसून आल्यावर नक्कीच तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. असाच प्रकार दिल्ली विद्यापीठ विद्यार्थ्यांच्या निवडणुकीत घडला. निवडून आलेला उमेदवार आणि प्रचारादरम्यान लावण्यात आलेल्या त्या उमेदवाराच्या पोस्टरवरील चेहऱ्यात भिन्नता असल्याचे लक्षात आल्यावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची उमेदवार कनिका शेखावतला मत देणाऱ्या दिल्ली विद्यापीठाच्या हजारो विद्यार्थ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. निवडणुकीदरम्यान शेखावतला मत देण्याची विनंती करणारी पोस्टरबाजी दिल्लीत अनेक ठिकाणी करण्यात आली होती. परंतु, पोस्टरवर छापण्यात आलेला फोटो हा मॉडेल आणि व्हिजे नौहीद सायरसचा असल्याचे उघड झाले. शेखावतच्या पारड्यात आपले मत टाकणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपली फसवणूक झाल्याची भावना व्यक्त केली. महाविद्यालयातील ही नेते मंडळी कॉलेजमध्ये फिरकत नसल्याने पोस्टरच्या माध्यमातूनच त्यांना ओळखण्याचा एकमेव मार्ग शिल्लक असल्याचे मत राहुल मिश्रा या विद्यार्थ्याने व्यक्त केले. तर, स्वाती सिन्हा या विद्यार्थीनीने युध्द आणि निवडणूकीत सर्वकाही चालत असल्याचे म्हणत, कनिकाला आपला फोटो चांगला येत नसल्याचे वाटत असावे, अशी शक्यता व्यक्त केली. शेखावतने पोस्टरबाजीच्या या प्रकरणाशी आपला संबंध नसल्याचे म्हणत, याचे खापर विरोधी पक्षावर फोडले. मिरांडा महाविद्यालयातून राज्यशास्त्रात पदवी प्राप्त केलेली शेखावत एआरएसडी महाविद्यालयातून राज्यशास्त्रात एमए करत आहे. या निवडणुकीत मुलींबाबतच्या मुद्यांना केंद्रस्थानी ठेवून निवडणूक जिंकलेली शेखावत मुळची राजस्थानची असून, गेल्या तीन वर्षापासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी निगडीत आहे. तिच्या विरुध्द उभा असलेला अमित टीमाचा तिने ३,०२२ मताने पराभव केला.
 
नौहीद सायरस