विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकीसाठी दिल्ली विद्यापीठातील ‘नॉर्थ कॅम्पस’मध्ये एनएसयूआयच्या प्रचाराला गेलेल्या माकन यांचा सामना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांशी झाला व त्यांना प्रचाराविना परतावे लागले! केंद्र व राज्यातील सत्तेतून पायउतार झाल्यामुळे फारसे काही काम न उरलेल्या काँग्रेस प्रदेश अध्यक्ष अजय माकन यांनी विद्यापीठस्तरीय निवडणुकीत लक्ष घातले आहे. एनएसयूआयचा प्रचार करण्यासाठी दिल्ली विद्यापीठात फिरणाऱ्या माकन यांना एकाही महाविद्यालयात प्रवेश करू देण्यात आला नाही. ते राजकीय पक्षाचे पदाधिकारी असून त्यांना नियमबाह्य़ पद्धतीने प्रचार करता येणार नसल्याची भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली.
दिल्ली व जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची निवडणूक  एनएसयूआय, अभाविप, एसएफआय या प्रमुख संघटनांमध्ये होते. यंदा आम आदमी पक्षाची छात्र युवा संघर्ष समितीदेखील (सीवायएसएस) मैदानात आहे. त्यामुळे एनएसयूआयच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. एरव्ही हरयाणातील विद्यार्थ्यांसाठी दिल्ली विद्यापीठात निवडणुकीच्या काळात तळ ठोकणारे दीपेंदर हुडादेखील यंदा फिरकले नाहीत.
सकाळी ९ ते ११ व दुपारी ५ ते पाच  अशी प्रचाराची वेळ असताना माकन भलत्याच वेळी ‘नॉर्थ कॅम्पस’मध्ये दाखल झाले. त्यांना कोणतेही पत्रक वाटण्यास, महाविद्यालयांमध्ये प्रवेश करण्यास अभाविप समर्थकांनी आक्षेप घेतला. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष विद्यार्थ्यांशी वाद घालतात- हे वृत्त पसरल्यास उलट परिणाम होण्याची भीती माकन यांना वाटल्याने ते वाहनातून विद्यापीठ परिसरात फेरफटका मारून परतले.

गुल पनाग प्रचारात
दिल्ली विद्यापीठाची निवडणुकीत अजय माकन यांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. ही निवडणूक अभाविप विरुद्ध एनएसयूआय करण्यावर त्यांचा भर आहे. मात्र ‘आप’च्या विद्यार्थी संघटनेने एनएसयूआयला निवडणुकीच्या स्पर्धेतून बाद केले. एनएसयूआयकडे एकही मोठा प्रचारक नाही तर सीवायएसएसने गुल पनाग यांच्या प्रमुख उपस्थितीत तालकटोरा स्टेडिअममध्ये लाइव्ह संगीत रजनी आयोजित केली आहे. त्यात सुमारे वीस हजार विद्यार्थी येण्याची शक्यता आहे.