तेलंगणामधील मेडक जिल्ह्यात कामा रेड्डी रेल्वेस्थानकाजवळ गुरूवारी सकाळी रेल्वे क्रॉसिंगवर नांदेड-हैदराबाद रेल्वेने स्कूलबसला धडक दिल्याने  झालेल्या अपघातात २५ विद्यार्थी जागीच ठार झाले, तर चार जण जखमी झाले आहेत. 
मेडक जिल्ह्यातील मसईपेठ गावाजवळील रेल्वे क्रॉसिंगवर ही घटना घडली. रात्री ११ वा. नांदेडहून निघालेली नांदेड-हैदराबाद पॅसेंजर गुरुवारी सकाळी नऊच्या सुमारास मेडक जिल्ह्यातील कामा रेड्डी रेल्वेस्थानकावर पोहोचली मात्र, नियोजित वेळेपेक्षा उशीर झाल्याने रेल्वे चालकाने रेल्वेचा वेग वाढविला आणि रेल्वेक्रॉसिंगवर फाटक नसल्याने स्कूलबस चालकानेही गाडी दामटवली. त्यामुळे हा भीषण अपघात घडला आणि २५ निरपराध शाळकरी मुलांना आपला जीव गमवावा लागला, तर चार विद्यार्थी जखमी झाले. जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या अपघातात स्कूलबस चालकाची चूक असल्याचे स्पष्टीकरण मंत्री हरीष राव यांनी दिले आहे. कारण, नसतानाही मुलांचा जीव धोक्यात घालून रेल्वे यायच्या आधी आपण निघून जाऊ या उद्देशाने त्याने बस दामटवली पण, रेल्वेचा वेग आणि अंतर लक्षात न आल्याने हा भीषण अपघात घडला असल्याचेही हरीष राव म्हणाले.