अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यासोबतच्या भोजन समारंभाचे आमंत्रण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात येऊनही ते पाठविण्यात हलगर्जीपणा करणाऱया महाराष्ट्र सदनातील अधिकारी संध्या पवार यांची तात्काळ प्रभावाने सक्तीने त्यांच्या मूळ खात्यात रवानगी करण्यात आली आहे. महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त आभा शुक्ला यांनी ‘लोकसत्ता’ला याबाबत माहिती दिली.
संध्या पवार यांच्याविरोधातील कारवाई अजून पूर्ण झालेली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या सगळ्या प्रकरणाचा चौकशी अहवाल शुक्रवारी सादर केला जाणार आहे. त्यानुसार संध्या पवार यांच्यावर अंतिम कारवाई होईल, असेही त्यांनी सांगितले. आभा शुक्ला यांच्या कारवाईनंतर संध्या पवार यांची सक्तीने राज्यातील अर्थ खात्यात रवानगी होईल. दरम्यान, कर्तव्यात कसूर केल्याबद्दल संध्या पवार यांच्यावर निलंबनाची कारवाईही होऊ शकते. मात्र, आभा शुक्ला यांनी तशी कारवाई केलेली नाही.
ओबामा भारत भेटीवर असताना राष्ट्रपती भवनात भोजन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह तीन मुख्यमंत्र्यांना निमंत्रण पाठविण्यात आले होते. मुख्यमंत्र्यांचे निमंत्रण नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात १७ जानेवारीला देण्यात आले. माजी निवासी आयुक्तांनी ते मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचविण्याची जबाबदारी संध्या पवार यांच्यावर सोपविली होती. त्यांनी चक्क स्पीड पोस्टने ते मुंबईला पाठविले. मुख्यमंत्र्यांना हे आमंत्रण पाठविल्याची कल्पनाच देण्यात आली नव्हती. ती मिळाली असती, तर आपण दाव्होसहून थेट दिल्लीलाच पोचलो असतो, असे फडणवीस यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले.