अरुणाचल प्रदेशातील धरण विरोधी कार्यकर्त्यांनी सियांग नदीवर दोन मोठय़ा धरणांना विरोध केला आहे. ही धरणे म्हणजे अन्याय, नववसाहतवाद व साम्राज्यवाद आहे असा आरोप करण्यात आला आहे.
केंद्रीय जलसंपदा मंत्री उमा भारती यांनी वार्ताहरांना सांगितले होते की, ब्रह्मपुत्रेचा प्रवाह सियांगमध्ये येतो, अरुणाचल प्रदेश व आसाममधील पुरांचे ते उत्तर आहे. सियांग नदीवर धरणे बांधण्याच्या प्रस्तावाची माहिती राज्याला दिलेली नाही, असे आसामचे मुख्यमंत्री तरूण गोगोई यांनी सांगितले. त्यावर स्वयंसेवी संस्था असलेल्या सियांग पीपल्स फोरमनेही या धरणांना विरोध केला आहे. उमा भारती व पंतप्रधान कार्यालयास संस्थेने फॅक्स पाठवला असून दिल्लीच्या सापत्नभावाचे हे आणखी एक उदाहरण आहे. एकीकडे गंगा स्वच्छता मोहीम राबवायची व दुसरीकडे सियांग नदीचा नाश करायचा हा दुटप्पीपणा आहे अशी टीका संस्थेने केली
आहे.
संस्थेचे माजी सरचिटणीस ओयार गाव यांनी सांगितले की, सियांग नदी आम्हाला पवित्र आहे. आम्ही तिला माता मानतो. सियांग नदीवर चाळीस धरणे बांधली जाणार आहेत, तिचा उगम यारलुंग सानगपो नदीच्या रूपात तिबेटच्या पठारावर होतो व नंतर ती ब्रह्मपुत्रेला मिळते. धरणांचा निर्णय जाहीर करताना तुम्ही अरूणाचल प्रदेशातील लोकांच्या भावना जाणून घेतल्या  नाहीत, असे संस्थेचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे गेल्या फेब्रुवारीत पासीघाट येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लहान जलविद्युत प्रकल्प सुरू करणार असल्याचे सांगितले होते त्यावेळी धरण विरोधकांनी त्या योजनेस पाठिंबा दिला होता. सियांग नदी राज्यात २९४ कि.मी भागातून जाते व २.५ लाख लोकांची ती जीवनदायिनी आहे.