शिवनेरी, रेल्वे प्रथम वर्ग, हॉटेलातले खाणे, मोबाइल बिल आजपासून महागणार

मोदी सरकारच्या द्विवर्षपूर्तीचा जल्लोष सुरू असतानाच महागाईत आणखी भर पडणार आहे. आर्थिक वर्षांची सुरुवात नसूनही तुमचे आमचे मोबाइल बिल, हॉटेलातील खाणे-पिणे इतकेच नव्हे तर शिवनेरी एसटीने जाणे आणि रेल्वेच्या प्रथम दर्जाच्या किंवा वातानुकूलित डब्यात प्रवेश करणे यासाठी बुधवारपासून अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.

स्वच्छतेसाठी सेवाकरात आधीच पाच टक्के अधिभार लागू झाला असताना आता कृषी कल्याणासाठी आणखी अर्धा टक्का अधिभार लादला जाणार आहे. चालू आर्थिक वर्षांत विस्तारण्यात आलेल्या १४.५ टक्के सेवा कर आता तब्बल १५ टक्क्य़ांवर जाणार आहे. त्याची अंमलबजावणी १ जूनपासून होत आहे.

शिवनेरी ‘सेवा’ही महागली!

एसटीच्या वातानुकूलित प्रवासावरही तब्बल सहा टक्के सेवाकर लादला गेला आहे. त्यामुळे शिवनेरी प्रवास महागला आहे. दादर-पुणे प्रवासासाठी सध्या ४२१ रुपये तिकीट आकारले जाते. त्यात २५ रुपयांची वाढ झाली असून या प्रवासासाठी ४४६ रुपये मोजावे लागणार आहे. स्वारगेट-मुंबई प्रवासासाठी ४३५ रुपयांऐवजी ४६१ रुपये मोजावे लागतील.

रेल्वे दरातही वाढ

रेल्वेचा प्रथम श्रेणी आणि वातानुकूलित दर्जाचा प्रवासही महागणार आहे. उपनगरीय रेल्वेचा प्रथम श्रेणीचा पास पाच रुपयांपासून २५ रुपयांपर्यंत महागणार आहे. तर वातानुकूलित दर्जाच्या तिकीट शुल्कातही पाच ते दहा रुपयांची वाढ होईल, असे रेल्वेतर्फे स्पष्ट करण्यात आले.

भविष्य निर्वाह धारकांना दिलासा

भविष्य निर्वाह निधीतील ५० हजार रुपयांपर्यंतची रक्कम मुदतीपूर्वी काढून घेण्यावरील उद्गमन कर (टीडीएस) केंद्र सरकारच्या नव्या अधिसूचनेनुसार आता रद्द करण्यात आला आहे. यासाठीची यापूर्वीची ३० हजार रुपयांची मर्यादाही १ जूनपासून विस्तारण्यात आली आहे.

काळ्या पैशासाठी व्यासपीठ

देशांतर्गत असलेले स्त्रोतविरहित उत्पन्न जाहीर करणारी सरकारची विशेष योजना १ जूनपासून सुरू होत आहे. ३० सप्टेंबपर्यंत मर्यादित कालावधीसाठी असलेली ही सूट कर तसेच दंड भरून घेता येईल. त्याचबरोबर पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू केलेल्या कराची मूळ रक्कम भरून व्याज तसेच दंडातून कंपन्यांची सुटका करणारी यंत्रणाही बुधवारपासूनच कार्यान्वित होत आहे.

आलिशान गाडय़ा महाग

तुम्ही १० लाख रुपयांपुढील मोटारगाडी खरेदी करणार असाल तर त्यावर आता एक टक्का अधिक कर लागू होणार आहे. हा अतिरिक्त कर विक्रेत्याकडून वसूल केला जाणार असून कारच्या एक्स-शोरुम किंमतीवर तो असेल. असे असले तरी ग्राहकाकडूनच ही रक्कम घेतली जाणार आहे.

सोने खरेदीवर कर नाही

दोन लाख रुपयांवर रोखीने खरेदी केलेल्या सोन्याच्या दागिन्यांवर लागू झालेला एक टक्का कर अखेर मागे घेण्यात आला आहे.

२०१६-१७च्या अर्थसंकल्पात याबाबतची तरतूद होती. ही मर्यादा आता पाच लाख रुपयांच्या सोने खरेदीसाठी लागू असेल.