ज्येष्ठ उद्योगपती आणि गोदरेज समूहाचे अध्यक्ष अदी गोदरेज यांची टीका
देशातील काही राज्यांमध्ये गोमांसावर घालण्यात आलेली बंदी आणि मद्यावर घालण्यात आलेले र्निबध यामुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम होत असल्याचे मत ज्येष्ठ उद्योगपती आणि गोदरेज समूहाचे अध्यक्ष अदी गोदरेज यांनी म्हटले आहे. सदर बंदीविरोधात वक्तव्य करून त्याचे अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होणार असल्याचे स्पष्ट मत व्यक्त करणारे गोदरेज हे भारतातील पहिलेच उद्योगपती आहेत.
केंद्र सरकारला सत्तेवर येऊन दोन वर्षे पूर्ण होत असतानाच गोदरेज यांनी वरील मत व्यक्त केले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर अनेक राज्ये गोमांस आणि दारूवर बंदी घालण्याचा विचार करीत आहेत. गेल्या दोन वर्षांतील सरकारच्या धोरणांचा सारासार विचार करता ती चांगली होती, आम्हालाही कमी दराचा लाभ झाला, भारत झपाटय़ाने वाढणारी अर्थव्यवस्था होऊ शकतो, भारत शक्तिशाली देश म्हणून विकसित होईल, असा विश्वास गोदरेज यांनी ‘दी इंडियन एक्स्प्रेस’कडे व्यक्त केला.
देशातील काही गोष्टींमुळे विकासाला बाधा निर्माण होत आहे, असे सांगताना गोदरेज यांनी काही राज्यांमध्ये गोमांसावर घालण्यात आलेल्या बंदीचे उदाहरण दिले. यामुळे कृषीक्षेत्र आणि ग्रामीण वाढीवर विपरीत परिणाम होत आहे. अतिरिक्त गायींचे तुम्ही काय करणार, असा सवाल त्यांनी केला. अनेक शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे ते साधन होते त्यांचा व्यवसाय बाधित झाला, असे ते म्हणाले. वैदिक काळात भारतीय गोमांस सेवन करीत होते, आपल्या धर्मात गोमांसाविरुद्ध काहीही नाही, दुष्काळानंतर ही प्रथा आली. कारण लहान मुलांना लागणाऱ्या दुधासाठी गायींचे पालन करा, हत्या करू नका, असे तेव्हा ज्येष्ठांनी सांगितले, त्यामुळे त्याकडे धार्मिक दृष्टिकोनातून पाहिले जाऊ लागले, हे हास्यास्पद आहे, वैदिक काळातील भारतीय गोमांस सेवन करीत होते, असे गोदरेज म्हणाले.
निवडणुका जिंकण्यासाठी आणि महिलांची मते मिळविण्यासाठी काही राज्ये आता मद्यावर बंदी घालत आहेत, बिहारने, केरळने संपूर्ण दारूबंदी केली आहे, हे अर्थव्यवस्थेसाठी घातक आहे, सामाजिक रचनेसाठी घातक आहे, त्यामुळे दारू पिण्याचे प्रमाण कमी होणार नाही, उलटपक्षी त्यामुळे बेकायदेशीर दारूला प्रोत्साहन मिळेल आणि माफिया तयार होतील, जगभरात हा प्रयोग अयशस्वी ठरला आहे, अमेरिकेत अयशस्वी ठरला आहे, भारतात प्रयोग करण्यात आला तोही अयशस्वी ठरला आहे, असे ते म्हणाले. राजकीय उद्दिष्टांसाठी हे निर्णय घेण्यात आले त्याचा अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार आहे, असे गोदरेज म्हणाले.