युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शनिवारी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी नरेंद्र मोदींना शालेय शिक्षणासाठी मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये वापरण्यात येणाऱ्या टॅबचे प्रात्यक्षिक दाखविले. हा टॅब नरेंद्र मोदींना खूपच आवडला असून, त्यांनी टॅबची अधिक माहिती करून घेण्यासाठी स्वत:जवळ एक टॅब ठेवून घेतल्याचे आदित्य ठाकरेंनी पत्रकारांना सांगितले.
आदित्य ठाकरे आणि मोदी यांच्यात सुमारे तासभर ही चर्चा सुरू होती. शालेय शिक्षणात टॅबचा वापर आणि सरकारच्या ‘डिजिटल इंडिया’ योजनेची कशाप्रकारे सांगड घालता येईल यासंदर्भात मोदी आणि आदित्य यांनी एकमेकांशी चर्चा केली. याशिवाय, आदित्य ठाकरेंनी नरेंद्र मोदींना मुंबईत आल्यास पालिकेच्या शाळांना भेट देण्याचे आमंत्रण दिले. मोदींनी व्हर्च्युअल क्लासरूमद्वारे पालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांशी संवाद साधावा, अशी कल्पना आपण मोदींसमोर मांडल्याचेही आदित्य यांनी सांगितले. गेल्या काही वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्याच्या दृष्टीने शिवसेना महापालिकेच्या शाळांमध्ये टॅबची संकल्पना राबविण्यासाठी प्रयत्न करत आहे. ही संकल्पना राज्यभरातील शाळांमध्ये राबविण्याचा सेनेचा मानस असून, सध्या त्यादृष्टीने हालचाली सुरू आहेत. मध्यंतरी राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनीदेखील शालेय विद्यार्थ्यांसाठी टॅबची सुविधा सुरु करावी, या दृष्टीने आम्ही सकारात्मक असल्याचे सांगितले होते.