उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांच्या शपथविधीआधी त्यांना योगी आदित्यनाथ म्हटले जायचे. सर्वच प्रसिद्धी माध्यमांकडून आदित्यनाथ यांचे नाव योगी आदित्यनाथ असे लिहिले जायचे. भाजपकडूनही आदित्यनाथ यांच्या नावाचा उल्लेख सर्वच कागदपत्रांमध्ये योगी आदित्यनाथ असाच करण्यात आला आहे. मात्र आदित्यनाथांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा स्वीकारल्यानंतर त्यांचे नाव नेमके कसे लिहिले जाते, याबद्दल गोंधळ निर्माण झाला आहे. कारण मुख्यमंत्र्यांच्या लखनऊमधील कालिदास मार्ग येथील सरकारी घराबाहेरील पाटी आतापर्यंत अनेकदा बदलण्यात आली आहे. त्यामुळे आदित्यनाथ यांच्या नावाबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेताच कालिदास मार्गावरील मुख्यमंत्र्यांच्या सरकारी निवासस्थानावर योगी आदित्यनाथ अशी पाटी लावण्यात आली. मात्र त्यानंतर त्यात बदल करण्यात आला आणि आदित्य नाथ योगी अशी पाटी लावण्यात आली. त्यानंतर पाटी पुन्हा एकदा बदलण्यात आली आणि सध्या कालिदास मार्गावरील मुख्यमंत्र्यांच्या सरकारी निवासस्थानाबाहेर योगी आदित्य नाथ अशी पाटी दिसून येते आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेताना आदित्यनाथ यांनी स्वत:चे नाव आदित्य नाथ योगी असे उच्चारले होते. मात्र आदित्यनाथ यांचे अधिकृत ट्विटर हँडल myogiadityanath असे आहे. तर अधिकृत फेसबुक खात्यावर त्यांचे नाव योगी आदित्यनाथ असे आहे. मात्र निवडणूक आयोगाला प्रतिज्ञापत्र सादर करताना त्यांनी योगी हा शब्द आतापर्यंत एकदाही वापरलेला नाही.

विशेष म्हणजे उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री कार्यालयातील कर्मचारीदेखील मुख्यमंत्र्यांचे नाव नेमके कसे लिहायचे, याबद्दल संभ्रमात आहेत. त्यामुळेच प्रसार माध्यमांना प्रसिद्धी पत्रक देताना अनेकदा मुख्यमंत्री कार्यालयातून आणि इतर विभागांमधून मुख्यमंत्र्यांचे नाव विविध पद्धतीने लिहिण्यात येते. कधीकधी उत्तर प्रदेश सरकारकडून आदित्य नाथ योगी नावाने प्रसिद्धी पत्रक पाठवण्यात येते, तर कधी योगी आदित्य नाथ असा उल्लेख प्रसिद्धी पत्रात करण्यात येतो.

आदित्यनाथ यांच्या नावामध्ये वारंवार बदल का करण्यात येत आहेत, याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समजू शकलेली नाही. यामागे ज्योतिष शास्त्रासंबंधी काही कारणे असू शकतात. कारण योगी हे पुरोहित असून ते गोरखनाथ मठाचे प्रमुख आहेत, अशी शक्यता काहींनी व्यक्त केली आहे.