प्रशासकीय अपयश हे नक्षलवाद फोफावण्यामागील अत्यंत महत्त्वाचे कारण असल्याचे मत झारखंडचे मुख्यमंत्री रघुवर दास यांनी व्यक्त केले आहे. आपले सरकार राज्यात विकासाभिमुख योजना आणि उत्तम कारभार करील, असे आश्वासन दास यांनी दिले आहे.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सहा दशके उलटली असतानाही गरीब ग्रामस्थ अद्यापही पिण्याचे पाणी, रस्ते, वीज या मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत ही दुर्दैवी बाब आहे, असेही दास यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
गावात डॉक्टर, शिक्षक, पाणी, रस्ते, वीज यांची वानवा असणे ही नक्षलवाद फोफावण्याची मुख्य कारणे आहेत. हे पूर्णत: प्रशासकीय अपयश असल्यानेच राज्यात नक्षलवाद वाढला आहे असे आपले ठाम मत असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
नक्षलवादी कोण आहेत, तेही समाजातील घटक आहेत, त्यांनाही रोजगाराची गरज आहे, स्वबचावासाठी त्यांना हातात शस्त्रे उचलण्यास भाग पाडण्यात आले आहे, असेही दास म्हणाले.
येत्या एक महिन्याच्या कालावधीत शिक्षकांच्या भरतीची प्रक्रिया सुरू होईल आणि १७ हजार पोलिसांचीही भरती केली जाईल, असेही ते म्हणाले.