नौदलातील वाढत्या अपघातांच्या घटनांमुळे डी. के. जोशी यांनी नौदलप्रमुखपदाचा राजीनामा दिल्यानंतर गेले दोन महिने रिक्त असलेल्या या पदावर गुरुवारी  रॉबिन के. धोवन यांची नियुक्ती करण्यात आली. धोवन यांनी आतापर्यंत आयएनएस दिल्ली, आयएनएस रणजीत, आयएनएस खुक्री या युद्धनौकांचे नेतृत्व केले आहे.
५९ वर्षीय धोवन हे गेली कित्येक वष्रे उपनौदलप्रमुख या पदावर कार्यरत होते. जोशी यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्याकडे हंगामी प्रमुख म्हणून जबाबदारी सोपावण्यात आली होती. अखेर गुरुवारी त्यांची नौदलप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. धोवन यांना २५ महिने हे पद सांभाळायचे आहे, अशी माहिती नौदलाच्या सूत्रांकडून देण्यात आली आहे.नौदलाच्या पश्चिम विभागाचे कमांडर व्हाइस अ‍ॅडमिरल शेखर सिन्हा आणि पूर्व विभागाचे प्रमुख व्हाइस अ‍ॅडमिरल अनिल चोप्रा यांची नावे चर्चेत होती. मात्र संरक्षण मंत्रालयाने धोवन यांच्या नावाची शिफारस पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्याकडे केली होती. त्यानुसार धोवन यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झाले.
धोवन  हे ‘राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी’चे (एनडीए) माजी विद्यार्थी असून, अमेरिकेतील डिफेन्स सव्‍‌र्हिस स्टाफ कॉलेज आणि नेव्हल वॉर कॉलेज येथूनही त्यांनी शिक्षण घेतलेले आहे. त्यांनी भारतीय नौदलात अनेक महत्त्वाच्या पदांवर कामे केली आहेत.
दुर्घटनांचे प्रमाण रोखण्यासाठी प्रयत्नशील
‘‘नौदलामधील युद्धनौकांच्या दुर्घटनांचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी प्रयत्न करणार आहे,’’ असे आश्वासन नवनियुक्त नौदलप्रमुख अ‍ॅडमिरल धोवन यांनी दिले. गेल्या काही वर्षांपासून नौदलाच्या युद्धनौकांमध्ये दुर्घटनांचे प्रमाण वाढल्याने नौदलाच्या सज्जतेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असल्याने धोवन यांचे हे वक्तव्य खूपच महत्त्वाचे आहे.‘‘नौदलासमोरील सर्व आव्हाने पेलण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. वाढत्या दुर्घटनांमुळे सध्या नौदल त्रस्त आहे. त्यामुळे दुर्घटनांचे प्रमाण कमी करण्यावर माझा भर असेल. दुर्घटना टाळण्यासाठी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरची (सोओपी) अंमलबजावणी तात्काळ करण्यात येणार आहे. या पद्धतीचा अवलंब केल्याने भविष्यात नौदलात एकही दुर्घटना होणार नाही, याची खात्री मी देतो,’’ असे नवनियुक्त नौदलप्रमुख म्हणाले.गेल्या १० महिन्यांत नौदलात १४ विविध दुर्घटना घडल्या, त्यातील दोन दुर्घटना नौदलाच्या पाणबुडय़ांवर घडल्या. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात आयएनएस सिंधुरक्षक या पाणबुडीवर घडलेल्या दुर्घटनेत १८ नौसैनिकांचा मृत्यू झाला होता.