नौदलाचे प्रमुख म्हणून अ‍ॅडमिरल सुनील लांबा यांनी सूत्रे हाती घेतली. देशाची सागरी सुरक्षा आणखी मजबूत केली जाईल, असे त्यांनी या वेळी सांगितले. नौदलातील दिशादर्शन व इतर तंत्रात पारंगत असलेले लांबा यांना तीन वर्षांचा कालावधी नौदलप्रमुख म्हणून मिळणार आहे. अ‍ॅडमिरल आर.के.धोवन निवृत्त झाल्याने त्यांची जागा लांबा यांनी घेतली आहे. नौदलप्रमुख होणे हा मोठा मान आहे, जगातील प्रसिद्ध असलेल्या भारतीय नौदलाचे नेतृत्व करायला मिळणे ही महत्त्वाची गोष्ट आहे, असे सांगून ते म्हणाले की, गेल्या काही काळात नौदलाचे आधुनिकीकरण झाले असून आमचे नौसैनिक व्यावसायिक प्रशिक्षित असून त्यांची देशभक्ती व वचनबद्धता अतुलनीय आहे. देशाच्या संरक्षणासाठी ते तत्पर आहेत. लांबा हे डिफेन्स सव्‍‌र्हिसेस स्टाफ कॉलेजचे माजी विद्यार्थी असून ते देशाचे २१ वे नौदल प्रमुख आहेत. पहिले दोन नौदल प्रमुख हे ब्रिटिश होते. लांबा यांना तीन दशकांचा अनुभव असून त्यांनी आयएनएस सिंधुदुर्ग व आयएनएस दुनागिरी या युद्धनौकांवर नॅव्हीगेटिंग ऑफिसर म्हणून काम केले आहे, तर आयएनएस काकिनाडा, आयएनएस हिमगिरी, आयएनएस रणविजय, आयएनएस मुंबई यांच्यावरही काम केले आहे. सिकंदराबाद येथील कॉलेज ऑफ डिफेन्स मॅनेजमेंटचे ते माजी विद्यार्थी असून तेथे त्यांनी अध्यापनही केले आहे. त्यांना परमविशिष्ट सेवा पदक व अतिविशिष्ट सेवा पदक मिळालेले आहे.