जर्मनीचा हुकूमशहा अ‍ॅडॉल्फ हिटलर याच्या ‘माइन काम्फ’ या आत्मचरित्राच्या त्याच्याजवळ असलेल्या एकमेव प्रतीचा लिलाव ऑनलाइन होणार असून त्याला १ लाख डॉलर इतकी किंमत मिळण्याची शक्यता आहे.
डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू डॉट हिस्टरीहंटर डॉट कॉम या संकेतस्थळावर या पुस्तकाचा लिलाव होणार असून या दुर्मीळ वस्तू विक्रेते क्रेग गोटलिब यांनी सांगितले, की माइन काम्फची ही फार दुर्मीळ प्रत आहे. हिटलरकडे त्याच्या पुस्तकाच्या अनेक प्रती होत्या पण त्यातील एक म्युनिक येथील त्याच्या अपार्टमेंटमध्ये होती, हिटलरने ती प्रत वाचलेली होती. १९३२ ची ही आवृत्ती असून त्यात हिटलरची बुकप्लेट आतल्या भागात आहे. १८ ऑक्टोबरला लिलावाची प्रक्रिया सुरू झाली असून ती १ नोव्हेंबर २०१४ पर्यंत चालणार आहे.
 माइन काम्फ म्हणजे ‘माझा लढा’ हे हिटलरचे आत्मचरित्र असून त्यात त्याने त्याची राजकीय विचारसरणी व जर्मनीबाबत भावी योजना मांडल्या होत्या. हिटलरने हे पुस्तक नोव्हेंबर १९२३ मध्ये लिहिले व ते जुलै १९२५ मध्ये प्रसिद्ध झाले.
१९४५ मध्ये अमेरिकी लष्कराचे लेफ्टनंट बेन लिबेर याना हिटलरच्या म्युनिक येथील घरात ज्या व्यक्तिगत वस्तू सापडल्या त्यात हे चरित्र होते. ते गेल्या वर्षी हिटलरच्या टोपी, शर्ट्स, पदके व इतर वस्तूंसह गोटलिब यांना विकण्यात आले होते. या पुस्तकाचा उल्लेख गोटलिब यांच्याकडे असलेल्या अनेक कागदपत्रात आहे. या पुस्तकास १ लाख डॉलर किंमत येईल असे अपेक्षित आहे. मेन काम्फच्या स्वाक्षरीकृत प्रतीला गेल्या मार्चमध्ये लॉसएंजल्स येथे ६५ हजार डॉलर किंमत आली होती. तशीच प्रत इंग्लंडमध्ये  ७० हजार डॉलरला विकली गेली होती.