भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि संरक्षणमंत्री तसेच काँग्रेस नेते ए. के. अँटनी हे पंतप्रधानपदासाठी तर गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे गृहमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार असल्याचे मत भाजपचे माजी विचारवंत गोविंदाचार्य यांनी व्यक्त केले आहे. गेल्या आठवडय़ात गोविंदाचार्य यांनी राहुल गांधी तसेच नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदासाठी योग्य उमेदवार नसल्याचे म्हटले होते.
रविवारी सायंकाळी येथे पत्रकारांनी २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर पंतप्रधानपदासाठी योग्य उमेदवाराबाबत विचारले असता गोविंदाचार्य यांनी  एनडीएतर्फे लालकृष्ण अडवाणी आणि यूपीएतर्फे अँटनी यांच्या नावाला पसंती दिली.
काँग्रेसप्रणीत आघाडीचे सरकार पुन्हा सत्तेवर आले तर काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि तरुण नेते राहुल गांधी हे युवा आणि क्रीडा खात्यासाठी योग्य उमेदवार असल्याचेही त्यांनी सांगितले.
काँग्रेसचे महासचिव आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग यांना चांगले आणि अनुभवी राजकारणी म्हणून गोविंदायार्च यांनी म्हटले आहे.