बिहार विधानसभेच्या निकालानंतर पक्षांतर्गत बंडाचा झेंडा उभारणारे भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी सरकारच्या कामाचे कौतुक केले आहे. ‘अच्छे दिन’ आणण्याच्या दृष्टीने सरकार योग्य मार्गावरून जात असल्याचे प्रशस्तिपत्रक त्यांनी दिले आहे.
अहमदाबाद महापालिका निवडणुकीत मतदान केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. व्यवस्थेत थोडा वेळ लागतो. त्याचे परिणाम चांगले दिसतील असा विश्वास अडवाणींनी व्यक्त केला. भाववाढ पाहता मोदी सरकारला आश्वासन पाळण्यात अपयश आले आहे काय, असे विचारता त्यांनी सरकारची पाठराखण केली. बिहारमधील निकालानंतर भाजपने परिश्रम घेतल्याने गुजरातमध्ये आम्हाला अनुकूल असे चित्र असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्यात सहा महापालिकांसाठी रविवारी मतदान झाले असून दोन डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.