कल्याणमध्ये राहणा-या युवक आरिफ एजाज माजिदच्या मृत्यूनंतर ‘अन्सार-उल-तौहीद’ या जिहादी संघटनेने श्रद्धांजली वाहिली आहे. २३ वर्षीय आरिफ अभियांत्रिकीचा विद्यार्थी होता. मागील आठवड्यात इराकमध्ये दहशतवादी कारवाईत सामील झालेल्या आरिफचा मृत्यू झाल्याची माहिती त्याच्या सहका-याने दिली होती.
 अंसार-उल-तौहीद या दहशतवादी संघटनेने आरिफला ऑनलाईन श्रद्धांजली वाहत त्याचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो ट्विटर, फेसबुक या सोशल मिडियावर पोस्ट करण्यात आला आहे.  पोस्टमध्ये आरिफला शहीद असे संबोधले आहे. आरिफचा मृत्यू झाल्यानंतर त्याला याप्रकारे पद्धतीने श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. आरिफच्या मृत्यूची बातमी कळताच त्याच्या कुटुंबियांनीही त्यांचा अंत्यविधी केला होता. उर्दू भाषेत लिहलेल्या या पोस्टमध्ये म्हटले आहे की,’ आम्हाला अल्लाचे काम पूर्ण करण्याचे काम दिले आहे. आपले बलिदानच आपल्याला यश मिळवून देईल. अन्सार-उल-तौहीद ही जिहादी विचाराची व दहशतवादी कारवायात गुंतलेली भारतातील सर्वात सक्रिय संघटना आहे. ही संघटना आपल्या उद्दिष्टांसाठी जे जे युवक सहभागी होतात त्यांना प्रशिक्षण देते तसेच त्यासाठीचे व्हिडिओ व फोटो ऑनलाईन पोस्ट करते.  काही दिवसांपूर्वी या संघटनेने इराक-सिरीया वांशिक लढ्यावेळी हिंदी, तमिळ आणि उर्दू मध्ये आयएसआयएस प्रमुखाचा संदेश पाठवला होता.