अफगाणिस्तानमधील लष्करी तळावरील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अफगाणचे संरक्षणमंत्री अब्दुल्ला हबीबी आणि लष्करप्रमूख कादम शाह शाहीम यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी यांनी या दोघांचा राजीनामा स्वीकारला आहे.

उत्तर अफगाणिस्तानमध्ये मझर-इ-शरिफ या शहराजवळील लष्करीतळावर दहशतवाद्यांनी शनिवारी हल्ला केला होता. या हल्ल्यात १६० हून अधिक जवानांचा मृत्यू झाला होता. तालिबानी दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. या हल्ल्यानंतर संरक्षणमंत्री आणि लष्करप्रमुखांच्या राजीनामा देण्याची मागणी जोर धरत होती. शेवटी या दोघांनी आपला राजीनामा राष्ट्रपतींकडे पाठवला. राष्ट्रपतींनीही त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे.

शनिवारी अफगाण सैन्याच्या तळावर १० सशस्त्र दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. हल्ला करताना दहशतवादी डॉक्टरांसारखा पेहराव करुन आले होते. सैन्याचे जवान नमाज अदा करत असताना हा हल्ला झाल्याने जीवितहानीचे प्रमाण जास्त होते. यामध्ये नव्याने सैन्यात भरती झालेल्या जवानांचे प्रमाणही लक्षणीय होते. हा हल्ला ज्या तळावर झाला त्यानंतर तळावरील कमांडर यांचीही उचलबांगडी करण्यात आली आहे. हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे संरक्षण मंत्री जिम मॅटिस हे काबूल दौऱ्यावर दाखल झाले आहेत.

२०१५ वर्षाच्या तुलनेत यंदा दहशतवादी हल्ल्यांमध्ये ३५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०१६ मध्ये ६,८०० सैनिक आणि पोलीस ठार झाले होते. अफगाणिस्तानमध्ये आयसिसने तळ ठोकल्याचे पाहून अमेरिकेने त्यांच्यावर कारवाई केली. नुकताच त्यांच्या एका तळावर मोठा बॉम्ब हल्ला करुन अनेक दहशतवादी त्यांनी ठार केले. या कारवाईनंतर तालिबानी संघटनेने हा हल्ला केला होता.