अफगाणिस्तानात पुढील आठवडय़ात होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या मुख्यालयाला तालिबानी दहशतवाद्यांनी शनिवारी लक्ष्य केल्याने खळबळ उडाली. दहशतवाद्यांच्या या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी या हल्ल्यामुळे येथील सुरक्षेवर नव्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
हमीद करझाई यांची मुदत संपत असल्याने ५ एप्रिलला अफगाणिस्तानच्या अध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. तालिबान्यांनी या निवडणुकीवर बहिष्कार घातला असून, त्यात बाधा आणण्याचा इशारा दिला आहे. हा धोका लक्षात घेता निवडणूक आयोगाच्या मुख्यालयाला छावणीचे स्वरूप आले आहे. तरीही दहशतवाद्यांनी शनिवारी या मुख्यालयाला लक्ष्य केले. या मुख्यालयापासून आठशे मीटर अंतरावर असणाऱ्या एका इमारतीमध्ये प्रवेश मिळवून तालिबान्यांनी शनिवारी दुपारी आयोगाच्या मुख्यालयाच्या संरक्षक भिंतींवर जोरदार बॉम्बफेक केली, तसेच मशीनगनच्या सहाय्याने अंदाधुंद गोळीबार केला. या विषयी आयोगाचे प्रवक्ता नूर मोहम्मद नूर यांनी सांगितले की, निवडणूक आयोगाच्या मुख्यालयावर तालिबान्यांनी हल्ला केला, हे खरे आहे. आम्ही दोन मोठे धमाके ऐकले, गोळीबार तर अजूनही सुरू आहे, मात्र मुख्यालयातील सर्व कर्मचारी व संबंधित सुरक्षित असून कोणाच्याही जिवाला धोका नाही. अफगाणिस्तानच्या गृह मंत्रालयानेही या हल्ल्याला दुजोरा दिला. गृह मंत्रालयाचे प्रवक्ता सादिक सिद्दिकी यांनी सांगितले की, किमान चार दहशतवाद्यांनी हा हल्ला केल्याची माहिती मिळत आहे, मात्र आयोगाच्या मुख्यालयात घुसणे या दहशतवाद्यांसाठी अशक्य आहे.
काबूल येथेच असणाऱ्या एका विश्रामगृहावर हल्ला करून तालिबान्यांनी शुक्रवारी दोन नागरिकांना ठार केले. अमेरिकेच्या एका स्वयंसेवी संस्थेचे कार्यकर्ते या विश्रामगृहात वास्तव्याला होते.