अमेरिका, अफगाणिस्तान, पाकिस्तान व चीनमध्ये चर्चा

अफगाणिस्तानमध्ये शांतता निर्माण करण्यासाठी त्या देशातील सरकारने थेट तालिबानी गटांशी चर्चा करावी असे मत अमेरिका, अफगाणिस्तान, पाकिस्तान व चीन या देशांनी व्यक्त केले आहे.

काल झालेल्या बैठकीनंतर जारी करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात असे म्हटले आहे, की सहभागी देशांनी एकता, सार्वभौमत्व व प्रादेशिक एकात्मता यांच्या रक्षणासाठी अफगाणिस्तान सरकार व तालिबान गटांचे प्रतिनिधी यांच्यात थेट चर्चा घडवून आणण्याची गरज प्रतिपादन केली. आता चार देशांचा हा गट १८ जानेवारीला काबूल येथे चर्चेची पुढची फेरी करणार आहे. गेल्या वर्षी या गटाची स्थापना करण्यात आली असून, तालिबानने हिवाळय़ात अनेक हल्ले केल्यानंतरच्या पाश्र्वभूमीवर ही चर्चा होत आहे, त्यात तालिबानशी समेट घडवण्याचा प्रयत्न केला जाईल. सर्व चारही देशांनी अफगाणिस्तानातील हिंसाचाराचा प्रश्न मार्गी लागला पाहिजे असे मत व्यक्त केले आहे. तालिबानच्या हिंसाचारामुळे अफगाणिस्तानात अशांतात असून त्याचा परिणाम शेजारी देशांवरही होत आहे. अफगाणिस्तानचे उपपरराष्ट्रमंत्री हेकमत खलील करजाई, पाकिस्तानचे परराष्ट्र सचिव एझाझ अहमद चौधरी, अमेरिकेचे अफगाण-पाकिस्तान कामकाज दूत रिचर्ड जी ओल्सन व चीनचे अफगाणिस्तानातील खास दूत डेंग शिजून उपस्थित होते. वास्तवादी मूल्यमापन व शांतता संधी तसेच अफगाणिस्तानात समेट अशा मुद्दय़ांवर व त्यातील अडथळय़ांवर चर्चा झाली. चतुष्कोण समन्वय गटाच्या चार देशांनी कुठल्या चौकटीत काम करावे याबाबत विचारविनिमय झाला. ९ डिसेंबर २०१५ रोजी पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या मुद्दय़ावर हार्ट ऑफ आशिया परिषदेचे आयोजन केले होते.