अफगाणिस्तानमधील काबूल येथे बुधवारी संध्याकाळी क्रिकेट स्टेडियमजवळ बॉम्बस्फोट झाला. या स्फोटात तीन जणांचा मृत्यू झाला असून क्रिकेट लीग सुरु असताना हा स्फोट घडवण्यात आला.  अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.

अफगाणिस्तानमध्ये सध्या क्रिकेट लीग सुरु असून बुधवारी काबूलमधील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सामना सुरु होता. या दरम्यान स्टेडियमजवळील तपासणी केंद्राजवळ स्फोट झाला. या स्फोटात सुरक्षा दलातील एका सैनिकासह तीन जणांचा मृत्यू झाल्याचे समजते. या स्फोटात सात जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. स्फोटाच्या आवाजाने स्टेडियममध्ये काही काळ भीतीचे वातावरण होते.  सुरक्षेच्या कारणास्तव सामना काही वेळ थांबवण्यात आला. सर्व प्रेक्षक आणि खेळाडू सुरक्षित असल्याची माहिती सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिली. सुरक्षेत वाढ करण्यात आल्यानंतर सामना पुन्हा सुरु झाला. अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.